स्मरण भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरु यांचे

भगतसिंघ एक पत्रकार आणि हुतात्मा

आज पासून 98 वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकाऱ्यांना दि. 23 मार्च 1931 रोजी मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. देशातील जनतेत इंग्रजा विरुद्ध व्याप्त रोष पाहता या महान क्रांतिकाऱ्यांना इंग्रजांनी एक दिवस अगोदर फासांवर चढवले. या घटनेने समस्त देश स्तब्ध झाला. स्वतंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकार करणारे देशाचे सर्वात मोठे नायक म्हणून हे हौतात्म्य त्रिकूट जगापुढे आले. आणि आज अठ्यानऊ वर्षानंतर देखील भारतीय जन्मानसात ते मोठे नायकच आहेत. त्यांची प्रतिमा आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून अशा महान हौतात्म्यांचे स्मरण करणे सुद्धा एक पुण्यच ठरते.

भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरु जिवलग मित्र होते. दि. 9 सप्टेम्बर, 1925 रोजी चंद्रशेखर आझाद यांनी हिन्दुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या दलाची पुनर्स्थापना केली. त्यावेळी कानपुर मध्ये हे त्रिकूट एकत्र आले होते. चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या जवाबदाऱ्या सौपावल्या.
तिघांची मैत्री प्रसिद्ध झाली. सुखदेव हे शीघ्रकोपी स्वाभवाचे होते तर भगतसिंघ आणि राजगुरु हे परिस्थितीचे भान ठेवूनच कृति करीत असे. सुखदेव यांना झोप घेणे खूप आवडायचे. एकदा हे तिघे एका गुप्त कार्यासाठी रेल्वेने यात्रा करत होते. डब्यात चांगलीच गर्दी होती. सुखदेव यांना गाढ़ झोप लागली. तेवढ्यात कुठून तरी एक मोठा सर्प रेलवेच्या डब्यात अवतरला. सर्प पाहताच यात्रेकरू मध्ये आरडओरड सुरु झाली.

घटनेची गंभीरता पाहता भगतसिंघ यांनी सुखदेव यांना जागे होण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांच्यावर कोणताच प्रभाव पडला नाही. तो सर्प सुखदेव यांच्या खांद्यावर चढून डोलू लागला. सुखदेव यांनी आरडओरड ऐकून डोळे उघडले आणि एक दृष्टी सर्पावर टाकून पुन्हा झोपी गेले. धाडस करून एकाने त्या सर्पाला पकडून डब्याबाहेर फेकले. भगतसिंघ यांनी स्वातंत्र्य संग्रामात असतांना काही काळ पत्रकार म्हणून ही भूमिका बजावली. पंजाबी आणि हिंदी मध्ये त्यांनी पत्रकारिता करून स्वातंत्र्यासाठी लिखान केले. अकाली, वीर अर्जुन, प्रताप अशा दैनिकात त्यांनी काही काळ लिहिले. 1924 मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या कांग्रेसच्या अधिवेशनात ते अकाली दैनिकाचे प्रतिनिधि म्हणून उपस्थित होते. येथूनच त्यांनी रायगडावर पोहचून छत्रपति शिवाजी महाराज यांच्या समाधिचे दर्शन घेतले होते.

त्यांनी श्री गुरु गोबिंदसिंघजी आणि छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पराक्रमांच्या कथा ऐकल्या आणि वाचल्या. कार्ल मार्क्स, आयरिश क्रांतिकारी डॉन ब्रिन यांच्या साहित्यांचे वाचन त्यांनी केले. म्हणूनच त्यांच्यात एक वीर योद्धा अवतरला. इंग्रजांनी सन 1929 मध्ये “सार्वजनिक सुरक्षा कायदा ” आणि “औद्योगिक विवाद कायदा ” असे दोन प्रस्ताव (Bill) आणले. लाहौर येथील विधानसभेत वायसराय या प्रस्तावाना मंजूरी देणार होते. वरील दोन्ही प्रस्तावाना मंजूरी पासून रोखण्यासाठी हिन्दुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन ने वीडा उचलला. भगतसिंघ, बटुकेश्वर दत्त आणि जयदेव कपूर यांनी ठरल्या प्रमाणे दि. 8 एप्रिल, 1929 रोजी लाहौर विधानसभेत बॉम्ब फेकून दोन्ही प्रस्तावांचा निषेध नोंदवला. यावेळी ” इंकलाब झिन्दाबाद ” असे नारे दिले.

बॉम्ब फेकून त्यांनी पळ नाही काढला व त्याच ठिकाणी ऊभे राहिले. सार्जेंट टेर्री यांनी पंधरा ते वीस मिनिटानान्तर भगतसिंघ आणि बटुकेश्वर दत्त यांना अटक केली. सुमारे दोन वर्षें त्यांच्यावर इंग्रजांनी लाहौर येथे खटला चालवला. त्यांच्यावर मनुष्यवध, हिंसा प्रसारित करणे, काकोरी लुटपाट घटनेत कामगिरी पार पाडने इत्यादि आरोप ठेवून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. भगतसिंघ यांचे वय फाशीच्या वेळी फक्त 23 वर्षें होते अल्पायुतच त्यांनी देशाच्या स्वतंत्रसंग्रामासाठी एक इतिहास रचला. या तिन्ही होतात्माना श्रद्धापूर्वक वंदन.

….रवींद्र सिंघ मोदी, पत्रकार.

You may also like

Popular News