पुणे शहरातून अल्पवयीन बालिकेला पळवून आणणारा युवक कुंटूर पोलिसांच्या ताब्यात

पुणे शहरातून एका 14 वर्षीय बालिकेला पळवून आणून निझामाबाद येथे काही महिने राहिलेल्या नायगाव तालुक्यातील एका युवकाला कुंटूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.आज पुणे पोलीस येणार असून पुढील कार्यवाहीसाठी त्या युवकाला घेऊन जाणार आहेत.

जानेवारी महिन्यापासून कुंटूर पोलीस वजिरागाव ता.नायगाव येथील युवक श्यामसुंदर गौतम भदरगेचा शोध घेत होते.कुंटूर पोलिसांना पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिसांनी माहिती दिली होती की,त्यांच्या हद्दीतून दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी श्यामसुंदर गौतम भदरगेने पुणे शहरातील एक 14 वर्षीय अल्पवयीन बालिका पळवून नेली आहे.तेव्हा पासून कुंटूर पोलीस त्याच्या मागावर होते.पुणे येथून पळून श्यामसुंदर गौतम भदरगेने बालिकेसोबत निझामाबाद येथे राहिला होता. वजिरगावात श्यामसुंदर भदरगेची आजी राहते. प्राप्त माहितीनुसार श्यामसुंदर भदरगे हा पुणे येथे कॅटरिंग व्यवसायात कामगार होता.बालिकेच्या घरासमोरच काही युवकांसोबत राहत होता.त्यावेळी पाणी आणण्यासाठी त्या बालिकेच्या घरी जाणे येणे झाले आणि श्यामसुंदर भदरगेने त्या अल्पवयीन बालिकेसोबत सूत जमवले.याप्रकरणाची कल्पना श्यामसुंदर भदरगेच्या सोबत एकच खोलीत राहणाऱ्या युवकांनी तिच्या आई-वडिलांना दिली होती.पण 25 जानेवारीला संधी साधून श्यामसुंदर भदरगेने बालिकेला पळवून नेले.

यासंदर्भाने बिबवेवाडी पुणे यापोलीस ठाण्यात श्यामसुंदर गौतम भदरगेचाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक एम.टी. निंबाळकर यांच्याकडे आहे.काल दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी कुंटूर पोलिसांना माहिती मिळाली की, श्यामसुंदर गौतम भदरगे बालिकेला घेऊन वजिरागाव येथे आला आहे. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी आपले सहकारी सहायक पोलीस उप निरीक्षक मारोती भोळे आणि पोलीस हवालदार अशोक दामोदर यांना वजिरगावला पाठवले.

भोळे आणि दामोदर यांनी वजिरगावतून श्यामसुंदर गौतम भदरगेसह अल्पवयीन बालिकेला ताब्यात घेतले आहे.यासंदर्भाची माहिती बिबवेवाडीला माहिती दिली आहे.आज महिला पोलीस उप निरीक्षक एम.टी.निंबाळकर आपल्या सहकारी पोलिसांसोबत कुंटूर येथे येणार आहेत.श्यामसुंदर गौतम भदरगेला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.अल्पवयीन बालिकेचे आई वडील सध्या कुंटूर येथेच आहेत.बालिकेच्या जबाबावरून श्यामसुंदर गौतम भदरगेविरुद्ध बालकांचे लैगिक अत्याचारा संरक्षण अधिनियमांच्या कलमाची वाढ झाली तर श्यामसुंदर गौतम भदरगेचा तुरुंगातील मुक्काम लांबलचक होणार आहे.

…….रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like

Popular News