8 एप्रिल रोजीचा खून आणि जीवघेणा हल्ला प्रकरणातील दोन युवक पोलिसांच्या ताब्यात

8 एप्रिलची मध्यरात्र पुर्ण होण्याअगोदर नांदेड शहरात दोन ठिकाणी पिस्तुलमधून गोळी बार करून दोन जणांचा जखमी आणि एकाचा खून करून त्याची चारचाकी पळवून नेणाऱ्या दोन युवकांना नांदेड पोलिसांनी आज जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

8 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या थोड्याअगोदर डॉ. सतिष गायकवाड आणि त्यांचे कुटूंबिय अंबेजोगाईवरून येत असताना मुसलमान वाडीजवळ एका मोटारसायकल आलेल्या दोन युवकांना त्यांच्या चारचाकी गाडीसमोर मोटार सायकल आडवी उभी करून गाडीच्या डाव्या बाजूच्या काचेतून गोळीबार केला. काच फुटून गोळी डॉ. गायकवाडच्या पाठीवर घासली आणि तिच गोळी त्यांचे मित्र गाडीचालक बशीर पठाण यांच्या हातावर लागली. या गाडीतील सर्व मंडळी गाडीतून उतरून मागे पळाली आणि त्याठिकाणी निवडणुकीसाठी लावलेल्या तपासणी नाक्यापर्यंत पोहचली. पळणाऱ्या या लोकांना हल्लेखोरांनी गाडीची चाबी मागितली होती, पण त्यांनी ती दिली नाही.

त्यानंतर हल्लेखोर आपल्या दुचाकीवर नांदेडकडे येत असताना बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यालयासमोर त्यांनी एक चारचाकी गाडी अडवली तिचा क्र. एम.एच. 24 ए.एस. 8447 असा होता. त्या गाडीतील एकटा चालक शेख नजीब याच्या उजव्या काखेखाली गोळी मारली त्यात शेख नजीबचा मृत्यू झाला. शेख नजीब आपल्या पत्नीला अहमदपूर येथे सोडून परत येत होता. या घटनेच्यादिवशी सर्वत्र पोलिस विविध नाक्यांवर उभे होते. काही तांत्रिक माहिती, पोलिसांचे काही खबरे अशी सर्व मंडळींनी मिळून या गाडीचा पाठलाग केला. गाडी शहरातील एका जागी मारेकरांनी उभी केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी मारेकऱ्यातील एका युवकाला ताब्यात घेतले आहे. शेख नजीबची गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी गाडी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी हल्ला केलेली पिस्तुल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

या प्रकरणातील आरोपींची नावे काही कारणाने सध्या गुप्त ठेवत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. झालेल्या प्रकाराला पोलिसांनी अत्यंत जलद प्रतिसाद देऊन हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांना आपल्या ताब्यात घेतले असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अपर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, इतवाराचे पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्यासह या मारेकऱ्यांना जेरबंद करणाऱ्या पथकातील अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

You may also like

Popular News