जबरी चोरी, घरफोडी, दोन मोटार सायकल चोरी

1 लाख 44 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे एक जबरी चोरी, सिंदखेडजवळच्या सारखणी येथे एक घरफोडी, नांदेड शहरातील डॉक्टर्स लेनमधून एक मोटारसायकल आणि किनवटच्या भाजी मार्केटजवळून एक मोटारसायकल अशा चार चोरी प्रकरणांमध्ये चोरट्यांनी 1 लाख 44 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरला आहे.

देगलूर शहराच्या नवीन बसस्थानकासमोर हॉटेलचे बिल का मागलास म्हणून काही लोकांनी हॉटेल मालक अनंत लक्ष्मणराव येसेमवार यास थापड-बुक्यांनी आणि लोखंडी रॉडने दोन्ही पायांच्या हाडांवर मारून त्यास गंभीर दुखापत केली. सोबतच त्याच्या खिशातील 4500 रूपयांचा मोबाईल बळजबरी चोरून नेला. देगलूर पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक गित्ते करीत आहेत. मौ. सारखणी ता. किनवट येथे रा. शेषेराव उर्फ शशीकांत नानू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्चच्या दुपारी 1 वाजल्यापासून 8 एप्रिल 2019 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला असून चोरट्यांनी कुलूप तोडून दार उघडले आणि आत प्रवेश करून लोखंडी कपाटाचे दार फोडले. त्यात असलेले 40 हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा 90 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी सिंदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

राजेश गोपालदास मोदी यांनी 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपली दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 ए.एच. 3666 ही 25 हजार रूपये किंमतीची गाडी डॉक्टर्स लेन भागात उभी केली होती, ती कोणी चोरट्यांनी चोरून नेली आहे. वजिराबाद पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार एस.पी. शिंदे अधिक तपास करीत आहेत. किनवट येथील शिक्षक उत्तम कोंडीबा भुजबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 एप्रिल 2019 रोजी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 26 ए.जे. 5921 ही किनवट शहरातील गोंडराजे मैदान भाजी मार्केट समोरून चोरून नेली आहे. किनवट पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार शेख मुनीर अधिक तपास करीत आहेत.

You may also like

Popular News