पंतप्रधानाच्या वाहन ताफ्यात आपली गाडी घुसवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अपयशी प्रयत्न

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना त्यांच्या वाहन ताफ्यातील नियमांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली गाडी त्या ताफ्यात घुसवण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न पाहता एकीकडे माणुस कितीही मोठा असला तरी दुसरीकडे त्याची किंमत शुन्य असते, याची जाणिव अनेकांना झाली.

महाराष्ट्र स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नंबर एकचे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख संख्या असलेले पोलिस दल त्यात गृह विभागाचे ते प्रमुख आहेत. सोबतच राज्यातील इतर सर्व जनता, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी या सर्वांपेक्षा त्यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी त्यांच्यासोबतच आले होते. येताना अत्यंत कमी गर्दी असलेल्या विमानतळावर हा ताफा सुरू झाला होता, त्यात सर्वात प्रमुख व्हीआयपी पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते. नरेंद्र मोदींच्या ताफ्यात चार गाड्या सर्वात महत्वपूर्ण असतात. त्यात पंतप्रधान कोणत्या गाडीत बसले हे फक्त पाहणाऱ्यांना माहित असते. त्या गाड्या दोन आणि दोन अशा रेषेत डब्याच्या आकारात रस्त्यावर चालतात. ताफ्यातील इतर गाड्या या डब्याच्या आकारात तयार झालेल्या पंतप्रधानांच्या पुढे आणि मागे चालतात. या ताफ्यात पहिली गाडी वॉर्निंग, द्वितीय गाडी पायलट, एस्कॉर्ट, रिंग राऊंड, व्हीआयपी, सेकंड रिंग राऊंड, अतिरिक्त व्हीआयपी गाडी आणि टेल कार अशा स्वरूपाची वाहन ताफ्याची संरचना असते.

ज्या प्रकारे पंतप्रधानांच्या वाहन ताफ्याला एक विशेष संरचना असते तशीच काहीशी संरचना मुख्यमंत्र्यांच्या वाहनताफ्याला असते. पंतप्रधानांच्या वाहन ताफा विमानतळ ते सभा स्थळ येत असताना सर्व काही ठीक झाले. अगोदर पंतप्रधानाचा ताफा आला आणि त्यानंतर मागे मुख्यमंत्र्यांचा वाहन ताफा आला. नांदेडची 6 एप्रिलची सभा ही पंतप्रधानांची त्यादिवशीची शेवटची सभा होती. त्यामुळे जाण्याची घाई ही सवार्ंंनाच होती. पंतप्रधानांसोबतच विमानतळावर पोहचले तर त्यांच्याशी काही शब्दसंवाद साधण्याचा मोका मिळेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या ताफ्यासह जाण्याची घाई होती. मुख्यमंत्र्यांच्या या घाईमुळे एक गडबड झाली. त्यांनी नियमावली तोडून पंतप्रधानांच्या वाहन ताफ्यात आपले वाहन घुसवण्याचा आदेश आपल्या चालकाला दिला, पण त्या चालकाने तो केलेला प्रयत्न वाहन ताफ्यातील इतर वाहनांनी अयशस्वी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. या घटनेची दखल पंतप्रधानाच्या सुरक्षा रक्षकातील मुख्य सुरक्षा रक्षकाने पण घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याचा चालक सुद्धा अत्यंत निष्णात असतो त्याला सुद्धा वाहन ताफ्यामध्ये आपली गाडी कशी चालवायची याची कल्पना असते. तरी पण त्याने वाहन ताफ्यातील नियमांना दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांचे आदेश महत्वपूर्ण मानले आणि पंतप्रधानाच्या वाहन ताफ्यात आपले वाहन घुसवण्याचा केलेला प्रयत्न अखेर फोल ठरला. काही मीटर अंतरापर्यंत मुख्यमंत्र्यांचे वाहन पंतप्रधानांच्या वाहन ताफ्यात चालत होते, पण ताफ्यातील पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक आणि त्या गाड्यांचे चालक यांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला ताफ्याबाहेर जाण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानांशी बोलायचे असेल तर त्यांना काही बंधन असतील पण इतर भारतातील नागरिकांच्या मानाने त्यांना ते सहज शक्य पण आहे. पंतप्रधानांना विचारून त्यांच्याच गाडीत मुख्यमंत्री बसले असते तर त्यांना जवळपास 20 मिनीटांचा विमानतळापर्यंत प्रवास सुद्धा बोलण्यासाठी भरपूर होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घाई आणि त्यांच्या वाहन चालकाने दाखवलेली हिंमत आज पाच दिवसानंतर सुद्धा चर्चेचा विषय आहे.

…..रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like

Popular News