खरंच मतदानाचा टक्का वाढेल?

राज्यभरात सतराव्या लोकसभेकरीता दि. ११ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत एकूण चार टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. संपूर्ण देशातील ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. साधारणपणे एप्रिल व मे हे दोन महिने लोकशाहीचा उत्सव चालणार असून त्यात प्रत्येकच भारतीय सहभागी झालेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. देशातील ५८ राज्यातल्या सर्वच लोकसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणूका घेणे म्हणजे लोकशाहीसमोर एक तगडे आव्हानच आहे. त्याबरोबरच प्रत्येक भारतीय नागरिकाने लोकशाहीचा मुख्य घटक बनून आपला मतदानाचा अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक ठरते. परंतु हे फारसं घडताना दिसत नाही. अशा सार्वत्रिक निवडणुकांतून मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी घसरणं ही चिंतनीय बाब आहे. त्यामुळे निद्रीस्त अवस्थेत असलेल्या मोठ्या मतदार समूहांना जागृत करण्याची, मतदानाचे आवाहन करण्याची व त्यासाठी नवनवीन क्लृप्त्या योजण्याची वेळ निवडणूक आयोगावर येणं म्हणजे मतदारांची प्रचंड उदासिनता राजेशाहीच्या पारंपारिक मानसिकतेत गुरफटून राहिलेल्या मतदारांनी लोकशाहीपुढे हे एक आव्हानच उभे केलेले आहे, असे म्हणावे लागेल.

मतदार जनजागृती अभियान चालविताना शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था यांना सहभागी करुन घेऊन पथनाट्य, स्वाक्षरी मोहीम, मतदानाची प्रतिज्ञा, पत्रलेखन, सुसंवाद कार्यशाळा, नातेवाईकांना भावनिक आवाहन, प्रभातफेरी, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, धावण्याच्या स्पर्धा अशा मतदानाचा संदेश देणार्‍या विविध स्पर्धा, दिव्यांग मतदार तथा तृतीयपंथी असा कोणताही समाजघटक वंचित राहू नये यासाठी मतदारांशी संवाद कार्यक्रम असे विविध उपक्रम मतदार जागृतीसाठी राबविले जातात. मतदानवाढीसाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावले जातात, जाहिराती प्रकाशित केल्या जातात. विविध स्लोगनद्वारे लोकशाहीच्या सबलीकरणाचे महत्त्व पटवून दिल्या जाते. या निवडणुकीसाठी चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच, मतदार स्वयंसहाय्यता केंद्र, मतदान केंद्रावरील विविध सोयी सुविधा, दिव्यांगासह वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी सुलभ निवडणूका हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करीत चर्चासत्रे, चित्रसंदेश, व्हिडीओ, चित्रफिती, दृकश्राव्य साधनांचा वापर, मेळावे, सोशल मिडियाचा उपयोग करुन जनजागृती करण्यासाठी फिरते चित्ररथ, पदयात्रा, चित्रप्रदर्शनी अशा उपक्रमांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांसह इतर आवश्यक त्या शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी संस्थांचीही मदत घेतली जात आहे. त्यांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मदतीने गॉंव शहर बोलेगा, पहले वोट करेगा, मॉर्निंग वॉक फॉर वोट असे परिणामकारक वातावरण निर्मितीकरीता प्रभावीपणाने राबविले जात आहेत. आदर्श मतदान केंद्र, महिलांचे वा दिव्यांग कर्मचार्‍यांचे मतदान केंद्र ह्या नवसंकल्पना ही प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी ऑटोरिक्षावाल्या एका चमूने मतदानाच्या दिवशी ने-आण करण्यासाठी मोफत सेवा देण्याचे जाहीर केले तर पेट्रोलपंपवाल्यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त करण्याचे ठरविले आहे. हा विचारच मूळात गौरवास पात्र आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर ही महाजनजागृती अभियान राबवूनही मतदानाचा टक्का वाढेल काय? हा रास्त प्रश्‍नही भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात उपस्थित होत आहे.

आदर्श मतदान केंद्रात पहिल्या शंभर मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाते. मतदान केंद्रासमोर रांगोळी काढणे, सनई चौघडे वाजविणे, दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर उपलब्ध करुन देणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी सहाय्य करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मतदारांच्या लहान मुलांसाठी तिथे काही काळ थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे याप्रमाणे मतदारांचे फारच लाड पुरविले जातात. महिलांनी म्हणजे सर्वच महिला कर्मचार्‍यांनी चालविले मतदान केंद्र व त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचार्‍यांनीच चालविले मतदान केंद्र अशा नव्या संकल्पना आयोगाच्या विचारात आहेत. काही उपक्रमांतून नाविण्यपूर्णता आणून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रभावित करण्याच्या या संकल्पना आहेत. त्याचबरोबर इव्हीएम मशीनवर जे सातत्याने आरोप केले जात होते त्यासाठी मतदारांना आश्‍वस्त करण्यासाठी व खात्रीने मतदान करुन सबंध लोकशाही वरील निष्ठा दृढ करण्याच्या प्रयत्नात व्हीव्हीपॅट या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव मतदारांमध्ये मतदानाविषयी कोणतीही शंका-कुशंका निर्माण होऊ नये यासाठी व जागरुकता हा केंद्रबिंदू मानून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

मतदानाविषयी आपल्याकडे प्रचंड उदासिनता दिसून येते. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होऊनही लोकशाहीच्या पावित्र्याचे संदर्भ लोकांच्या लक्षातच येत नाहीत. मतदानाच्या दिवशी सुशिक्षीत लोकंही मिळणार्‍या सुट्टीचा उपभोग आनंदी विकेन्डसारख्या सुट्टी प्रमाणे साजरा करतात. आपण एक मत न दिल्यामुळे काय बिघडणार आहे? यांना मत देऊन काय उपयोग? याची निवडणूकीला उभं राहण्याची लायकी तर आहे का? परंतु उमेदवार पसंत नसेल तर नोटा हा पर्याय दिलेला आहेच की! राजकारण्यांच्या नसत्या उठाठेवींपेक्षा आपण कुणालाही शब्द न देता मतदान न केलेलच चांगलं अशा काही नकारात्मक मानसिकता या बहाणेबाज लोकांमध्ये असतात. त्यांना एक मत एक मूल्य ही संकल्पनाच समजलेली नसते. मतदानाच्या दिवशीच बरेचसे महाभाग मतदार यादीत आपली नावे शोधतात. ते नसले की मग मतदानाविषयी त्यांची आसक्ती उरत नाही. मयत, स्थलांतरीत, दुबार अशी नावे वगळण्यात येतात. आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे खात्री करुन घेणे मतदारांचेच कर्तव्य आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्या यादी भागाची पिडीएफ यादी आपणांस डाऊनलोड करता येते ही सुविधाही उपलब्ध आहे.

मतदारांकडे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणारा पुरावा नसल्यास त्यांना मतदान करु दिले जात नाही. त्यामुळे ते मतदानकेंद्राकडे पाठ फिरवितात. यापूर्वीच्या निवडणुकांत मतदानकार्ड व्यतिरिक्त सतरा पुरावे ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु आता फक्त अकरा पुरावेच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांची ओळख पटविण्याचे काम मतदान केंद्रावर मतदान अधिकारी क्रमांक -१ हा करीत असतो. मतदानाच्यावेळी मतदाराकडे निवडणूक मतदान ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. ते नसेल तर अकरा पुराव्यापैकी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र- राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी कंपन्या अथवा कारखाने यांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोष्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, आयकर विभागाकडील पॅनकार्ड, जनगणना आयुक्त यांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन पेमेंट ऑर्डर, आमदार, खासदार यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यापैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरल्या जाणार आहे. मात्र मालमत्तेची कागदपत्रे, शस्त्रास्त्र परवाना, निवृत्त कर्मचार्‍यांच्या विधवा, अवलंबिता प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र व रेल्वे पासचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे अकरा पुराव्यांपैकी एक असल्यास मतदान करता येईल. परंतु काही भारतीय नागरिक कोणताही पुरावा नसताना मी काय पाकिस्तानचा आहे काय? मला कसं काय मतदान करु देत नाही? बघतो! म्हणून मतदान अधिकार्‍यांशी हुज्जत घालीत असतात. याबाबतही मतदारांमध्ये मतदानापूर्वी जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

मतदान केंद्रावर चार अधिकारी असतात. त्यापैकी केंद्र अध्यक्ष पद सांभाळणारी ही अत्यंत जबाबदार व्यक्ती असते. ती संपूर्णपणे प्रशिक्षित असते किंबहुना ती असलीच पाहिजे. सर्व अभिलेखे तयार करणे व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आपल्या संनियंत्रणाखाली यशस्वीरित्या पार पाडली गेली पाहिजे. यासाठी मुख्यतः तो जबाबदार असतो. मतदारांची ओळख पटल्यानंतर तो मतदान केंद्रावरील अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे जातो. परंतु काही ठिकाणी पडदानशीन मतदार असतील तर तिथे ओळख पटवून देण्यासाठी एका महिला कर्मचार्‍याची नेमणूक केल्या जाते. अशाप्रकारे मतदान अधिकारी क्रं. २ कडे गेल्यावर तिथे त्यांच्या बोटाला शाई लावली जाते. बोटाला शाई लावण्याचेही काही नियम आहेत ते प्रशिक्षणाच्या वेळेला समजावून सांगितले जातात. बोटाला शाई लावण्यापूर्वी मतदारांची स्वाक्षरी नोंदविली जाते. अंगठेबहाद्दरांच्या मोठ्या संख्येमुळे साक्षरतेचे प्रमाण लक्षात येते. त्यानंतर अधिकारी-दोन व्होटर रजिस्टर व व्होटर स्लीपवर नोंदी करुन त्याच्या स्वाक्षरीसह अधिकारी क्रमांक- तीन कडे सुंपूर्द करतो. त्यापूर्वी मतदाराजवळ असलेल्या अकरा पुराव्यांपैकी एकाची नोंदही केली जाते. एवढी प्रक्रिया झाल्यावरच तिसरा अधिकारी बॅलेट देतो आणि मशीन मतदान स्विकारण्यासाठी सज्ज होते. आता या निवडणुकीत प्रत्येकच केंद्रावर व्हीव्हीपॅट ही नवीनच मशीन सोबतीला आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

एका बॅलेट युनिटवर नोटासह सोळा उमेदवारांची सोय असते. त्यापैकी एक नोटा असतो. १६ पेक्षा जास्त उमेदवार असतील तर सोळाच्या पटीत बॅलेट युनिटची संख्या पण वाढणार आहे. तुम्ही मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात सेकंदाकरीता ज्या उमेदवाराला मतदान केले आहे त्याच्या नाव व चिन्हासह एक एटीएममधून निघणार्‍या स्लिपसारखी चिठ्ठी दिसणार आहे. ती चिठ्ठी पाहून मतदारांची खात्री पटणार आहे. एखाद्या मतदाराने ती चिठ्ठी मागण्याची विनंती केल्यास ती चिठ्ठी मिळणार नाही. कारण ती मशीनमध्येच जमा करण्याची सोय आहे. मात्र मशीनवर खोटा आक्षेप घेतल्यास आणि तो सिद्ध झाल्यास कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. टेंडर मतदानाची (दुबार/प्रदत्त) सोय, अंधांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका, दिव्यांगांसाठी मदतनीस व व्हीलचेअर, सैनिकांसाठी मतदानाची सोय, कर्तव्यावरील कर्मचार्‍यांसाठी टपाली मतपत्रिका, आक्षेपित मतांची कार्यवाही, निःसमर्थ मतदारांचे मतदान, परदेशी मतदारांचे मतदान अशा सुविधा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पर्याप्त आहेत. तसेच गोपनियतेचा भंग होणार नाही, तोतयेगिरीला आळा बसेल, भीतीपोटी वावरणार्‍या एखाद्या समूहाला पुरेशी सुरक्षा पुरवून अत्यंत शांततेने व निर्भयतेने मतदान व्हावे व मतदाराला मतदान केल्याचा अभिमान वाटावा यासाठी आयोग प्रयत्नशील असतो. पण विनाकारण मतदान केंद्रावर हुज्जत घालणे, प्रक्रिया बंद पाडणे, हाणामारीचे प्रसंग उद्भवणे, मतदान अधिकार्‍यांना दमदाटी करणे, मतदान करताना कुरापती करणे, वेडेवाकडे इशारे करणे, मद्यपि मतदारांनी मतदान केंद्रात येऊन गोंधळ घालणे यापेक्षा समाजातील विविध स्तरातील लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी त्या-त्या मतदान केंद्राअंतर्गंत सामाजिक संस्था, युवक मंडळे आदींनी पुढाकार घ्यायला हवा. सकाळच्या अभिरुप मतदानापासून ते मतदान प्रक्रिया पूर्णतः संपेपर्यंत मतदान प्रतिनिधीसह सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. गावातील हंगामी स्थलांतरीत मतदारांना त्यांच्या कुटुंबासह मतदानासाठी येण्याची विनंती करावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून भर उन्हात लोक मतदानासाठी येत नाहीत. मतदानाची वेळ वाढविण्यात आलेली असली तरी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर मतदान झाले पाहिजे. कधी-कधी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी मतदान केंद्रात मतदारांची संख्या मोठी असते. कितीही लोक असतील तरीही त्यांचे मतदान पूर्ण होणे आवश्यक असते. वाढते तापमान लक्षात घेता लोक मतदानासाठी घराबाहेर पडतील याची शाश्‍वती नाही. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या जास्त असेल तर तिथे मशीनमध्ये मत नोंदण्यास वेळ लागत असल्यामुळे मतदान केंद्रावर काही सुविधा पुरवून भर उन्हातही मतदान करुन घ्यावे लागेल. कारण आपल्याला कोण्या एका उमेदवाराला नव्हे तर लोकशाहीला विजयी करावयाचे आहे. देशातली लोकशाही आणखी मजबूत करावयाची आहे. असंवैधानिक घटना सातत्याने घडत राहिल्या तर लोकशाहीच्या मूळ संरचनेलाच तडे जाऊ शकतात. मतदान हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे. त्यासाठी भारतीय नागरिक म्हणून कोणत्याही दबावाला वा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला बळी न पडता अत्यंत कर्तव्यकठोरतेने मतदान करावे. लोकशाहीच्या या महाउत्सवात सर्वच भारतीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

….. गंगाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३.

You may also like

Popular News