अल्पवयीन बालिकेला माता बनविणाऱ्या युवकाला 10 वर्षे सक्तमजुरी

15 हजार रुपये रोख दंड

एका अल्पवयीन बालिकेला माता बनवणाऱ्या एका युवकाला 4 थे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी 10 वर्षे सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस ठाणे मुदखेडच्या हद्दीतील एका 16 वर्षीय बालिकेला 18 जून 2017 रोजी पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे आणले. तिच्या घरातील मंडळी तिच्या पोटात असलेल्या वेदना ओळखू शकल्या नाहीत. शासकीय रुग्णालयात तिने एका पुरूष बाळाला जन्म दिला. या बालिकेची आई वेडसर असल्यामुळे ती आपल्या इतर नातलगांकडे राहत होती. अल्पवयीन बालिकेला बाळ जन्मल्याचे पाहिल्यानंतर तिच्या मामाने केलेल्या विचारपुस नंतर हा प्रकार गंगाधर उर्फ गंग्या कैलास भारती (20) या युवकाने केल्याचे त्या बालिकेने सांगितले. या संदर्भाने त्या बालिकेच्या मामाने दि.24 जून 2017 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मुदखेड पोलीस स्थानकात भारतीय दंडविधानाची कलमे 376(2)(आय) सोबत 3, 4, 5 (जे) (2) आणि 6 या बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन खंडागळे यांच्याकडे देण्यात आला.

नितीन खंडागळे यांनी नितीन खंडागळे यांनी 26 जून 2017 रोजी ती पिडीत अल्पवयीन बालिका, तिने जन्म दिलेले मुल आणि गंगाधर उर्फ गंग्या भारती या तिघांचे जैविक नाते तपासणी करून मिळण्याची विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डीएनए चाचणी किट प्रमाणे या तिघांचे जैविक नमुने घेतले आणि तपासणीसाठी पाठविले. या तपासणीत अल्पवयीन बालिकेने जन्म दिलेल्या मुलाचा जैविक पिता गंगाधर उर्फ गंग्या भारती असल्याचा अहवाल आला. नितीन खंडागळे यांनी गंगाधर भारती विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. अल्पवयीन बालिकेने जन्म दिलेले बालक 1 ऑगस्ट 2017 रोजी मरण पावले.

या खटल्याच्या साक्षीपुराव्यांच्या दरम्यान पिडीत बालिका, तक्रार देणारा तिचा मामा या सर्वांनी आपल्या साक्षी फिरविल्या. पण डीएनए चाचणीचा आलेला अहवाल हा गंगाधर भारतीच्या विरुध्दच होता. या प्रकरणात 11 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. उपलब्ध पुरावा आधारे विशेष करून डीएनए चाचणीप्रमाणे आलेला अहवाल सर्वात महत्वपूर्ण ठरला आणि 4 थे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी गंगाधर उर्फ गंग्या कैलास भारती यास विशेष सत्र खटला क्रमांक 33/2017 मध्ये दोषी मानले. गंगाधर भारतीला एका अल्पवयीन बालिकेला माता बनविण्याच्या कारणासाठी त्याला 10 वर्षे सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. रणजित देशमुख यांनी मानली. या खटल्यातील मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अजय साखळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.

……रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like

Popular News