बाबासाहेबांच्या जयंतीचे क्रांतीसौंदर्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म म्हणजे एका क्रांतीसूर्याचा आणि जयंती म्हणजे एक कडाडती युद्धघोषणा पण रक्तविहीन क्रांतीच! बाबासाहेब नावाच्या एका युगनायकाचा उदय महासागराला आलेली आनंदाची भरती होय. शब्दही थिटे पडावेत आणि विशेषणेही गळून पडावीत इतक्या अत्युच्च प्रबुद्ध शिखरांवर विराजमान झालेली बाबासाहेबांची जयंती पिढ्यान् पिढ्या माणसात क्रांतीसौंदर्यच प्रस्थापित करीत आली. जगण्याचं स्फुल्लींग चेतवित आली.

हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या काळोख्या क्षितिजावर हा भीमभास्कर जन्माला येणे म्हणजे शोषणाचे, विषमतेचे बुरुज उद्धवस्त करीत तमाम चराचर प्रकाशमान करीत जाणे होय. हा भीमभास्कर एकदाच उगवत नसतो. तो सातत्यानं मानवी मनाच्या काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशपालवी म्हणून लखलखत असतो. तो मानवतेच्या सांस्कृतिक प्रदेशात सुंदर मानवी जीवनाची पुनर्रचना करीत मध्यान्हीचा सूर्य म्हणून कायम तळपत असतो. हीच बाबासाहेबांच्या जयंतीची परिभाषा आहे. बाबासाहेबांची ही जयंती नेहमीच नव्या क्रांतीला जन्म देते. म्हणून आजच्या दलित माणसांत आंबेडकरी नवे तेजोगोल जन्माला येतात. नवा जन्म झालेला माणूस दलितत्वाची कात बाजूला काढून टाकतो आणि आंबेडकरी जयंतीचा सोहळा आपल्या रोमारोमांत सामावून घेतो. बाबासाहेबांची पहिली जयंती त्यांच्या वाढदिवसाच्या रुपाने पुण्यातच सर्वप्रथम १४ एप्रिल १९२८ रोजी जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरी केली. इथूनच बाबासाहेबांच्या भीमजयंतीचा पायंडा पडायला सुरुवात झाली. बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरुन प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक गावागावात, शहराशहरांत भीमजयंतीचे सोहळे सुरु झाले. अत्यंत दबावाखाली राहत आलेल्या लोकांनी जयंतीच्या माध्यमातून व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकायला सुरुवात केली.

भीमसंस्काराने पेटलेला हा तरुण स्वतःचे रक्त सांडायला तयार झाला. जागोजागी बाबासाहेबांचे पुतळे उभे राहू लागले. जिथे धम्मध्वज उभारला ती जमीन रणभूमी म्हणून शिक्कामोर्तब होऊ लागली. देशात असं गाव नाही, जिथं बाबासाहेबाचं नाव नाही, ही चळवळ जोर धरु लागली. पँथरने मर्दानी भीमसैनिक तयार केले. गावातल्या मुख्य रस्त्यावरुन बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वाजत गाजत निघू लागली. बाबासाहेबांची जयंती एखाद्या सणासारखी साजरी होऊ लागली. कामधंद्याच्या निमित्ताने दूर असलेली लोकं, नांदायला गेलेल्या लेकींना जयंतीची आतूर ओढ लागायची. जयंती साजरी करायला गावाकडे परतू लागली. दोन-चार बैलगाड्या नवरीसारख्या पिंपळपानांनी सजविलेल्या त्यात एकीत बाबासाहेबांचे तैलचित्र. एका बैलगाडीत लहान मुले बसलेली. दुसर्‌या बैलगाडीत लाऊड स्पीकर ठेवलेला त्यामागे तरुण व पुरुष मंडळी चाललेली. बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा. चौथ्या बैलगाडीतही बाबासाहेबांच्या प्रतिमा, लहान मुले आणि लाऊडस्पिकर. शुभ्रवस्त्रे परिधान केलेली मुली, बायका, वृद्ध स्त्रियाही अत्यंत आनंदाने, उत्साहाने मिरवणूकीत सामील होत असत. एकामुखाने जय भीमची घोषणा होई! रस्त्यावरची झाडे, दुकाने, जयंती लांबून पाहणारी सवर्ण माणसे, झाडावरचे पक्षी जणू म्हणत- अरंररं घुमतय काय? बाबासाहेबांची जयंती हाय!’

‘आपल्या देशाला आंबेडकर बाबा आलाय म्हणं माय!’ हे त्या काळच्या वृद्ध स्त्रियांच्या तोंडचे ऐतिहासिक वाक्य. आंबेडकर बाबा कळायला आणि त्यांच्या गावातून जयंती मिरवायला दमनाने आणि शोषणाने खंगून गेलेल्या आमच्या दीन बांधवांना खूप वेळ लागला. जेंव्हा बाबासाहेब थोडे फार कळायला लागले तेंव्हा भीम गीत गायन पार्ट्यांनी जन्म घेतला. आंबेडकरी जलसेकार तयार झाले. तसं आमच्या घरी लिव्हणं कुठं व्हतं? गाणंच होतं. आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य आणि नव्या विद्रोहाची रंगभूमी बाळसे धरु लागली. बाबासाहेब आसमंतात उद्घोषणारे एक नवे पर्व निर्माण झाले. शाहिरांची, गायकांची, गीतकारांची, कवींची मांदियाळी उदयाला आली. या लोकांनी आपापल्या कलात्मक कार्यकौशल्याने बाबासाहेब प्रत्येक घराच्या दारावर चितारला. कौलारु छतांवर शीलध्वज फडकू लागला. आवाज नसलेली माणसं आता जयभीम, जय बुद्ध, जय भारत बोलू लागली होती. भीमजयंती दरवर्षी नवी प्रभा घेऊन आमच्या महारवाड्याचे बौद्ध वसाहतीत मूल्यांतर घडवायला नव्याने येत होती. ही जयंती ह्या युगानुयुगाच्या हताश जीवनाला प्रफुल्लीत करीत होती. हाती शस्त्र नसलेल्या माणसाला युद्धविद्या शिकवित होती. बाबासाहेबांचं प्रत्येकच गाणं चराचरा मनुची वसाहत कापीत जात होतं. तद्वतच बाबासाहेबांवरची वक्तव्यांची भाषणं वैचारिक परिवर्तनाचा स्वयंदीप चेतवून जात होती. दरवर्षीच येणारी बाबासाहेबांची जयंती हर्षोल्हासासह माणसांना जगण्याचं, झुंजण्याचं अफाट बळ देऊन जात होती.

जयंतीच्या दिवशी मिरवणूकीत निळ पडली म्हणून आणि ‘त्या’ रस्त्याने जायचे नाही म्हणून दंगली भडकू लागल्या. दगडफेक होऊ लागली. माणसं रक्तानं न्हाऊ लागली. पण त्या रक्तथेंबांतून क्रांतीची बीजं शिवारत होती. त्वेषानं लढण्याचं बळ ही जयंतीच देत होती. ती दगडं फेकरणार्‍यालाही क्रांतीचं विज्ञान शिकवत होती. त्यामुळेच बाबासाहेबांच्या जयंती तत्त्वज्ञानाचे बाळकडू प्यालेली पहिली पिढी शिक्षणाच्या प्रबुद्ध शिखरांवर विराजमान झाली. दिव्यानं दिवा पेटावा तशी येणारी पिढीही प्रज्वलीत होऊ लागली. त्यातून काही बांधव शिकू शकले नाहीत त्यांनी रस्त्यावरच्या चळवळी मजबूत केल्या. संघटना बांधल्या. स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारासाठी त्या संघर्ष करु लागल्या. या संघर्षातूनच आज टोलेजंग इमारतींच्या कुलीन आंबेडकरी वसाहती निर्माण झाल्यात. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचत नाचत ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतले त्यांना जयंतीचे मर्म समजले. जयंती अशा पद्धतीने क्रांतीचे सौंदर्य प्रस्थापित करु लागली. अख्खी आंबेडकरी कुटुंबच या चळवळीत सौंदर्यवान झाले. बाबासाहेबांनी निर्देशित केलेले ध्येय उराशी बाळगून जो तो वाटचाल करु लागला. स्वचिंतन, स्वभान, स्वजाणिवा, स्वाभिमान आणि स्वावलंबन ह्या पंचसूत्रीमुळे काळोख्या रात्रींचे अत्‌पौर्णिमेत रुपांतरण झाले, हे जयंतीचे क्रांतीसौंदर्यच होय.

बाबासाहेबांच्या जयंतीचे स्वरुप अमूलाग्र बदलेले आहे आता ते वैश्‍विक झाले आहे. केवळ आंबेडकरी अनुयायीच बाबासाहेबांना अभिवादन करतात असे नाही तर देशभरातील तमाम शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, खाजगी संस्था, बौद्ध विहारे, सार्वजनिक स्थळे, विद्यापीठे अशा सर्वच ठिकाणी जयंती साजरी केली जाते. एव्हढेच नव्हे तर जगातील ६५ पेक्षा जास्त देशांत बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. त्यापैकी अमेरिका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राझील, डेन्मार्क, बांग्लादेश, मिस्त्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, इराक, आयर्लंड, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, जापान, मेदागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रान्स, श्रीलंका, सेसेल्स, दक्षिण सुदान, स्पेन, स्विर्त्झलँड, टांझानिया, ग्रेट ब्रिटन, लंडन, युक्रेन, कॅनडा, हंगेरी, म्यानमार, कुवैत, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, न्युझीलंड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सीस्को हे प्रमुख देश आहेत.

बाबासाहेबांची जयंती साजरी करताना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन केले जाते. पुतळ्याला पुष्पहार घालून, अन्नदान करणे, पाण्याची व्यवस्था करणे, व्याख्यानांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, मिरवणुकीत सहभागी होणे, भव्य देखाव्यांचे आयोजन करणे, अठरा तास अभ्यास उपक्रम राबविणे असे किंवा यापेक्षाही अधिक भरीव स्वरुपाचे कार्यक्रम राबविले जातात. जयंतीच्या निमित्ताने येणारा क्रांतीविचार म्हणजे माणुसकीचे मार्गदर्शक तत्त्वेच आहेत. मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान ऐक्याचे आणि कल्याणाचे संविधान बनून आपल्या हाती येत असते. बाबासाहेबांची जयंती म्हणजे माणसाच्या जगण्याला क्रांती मानणार्‍या लोकांच्या मनात स्फुल्लींग चेतविणारी कार्यशाळाच होय. सन २०१७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिल हा जन्मदिवस ‘ज्ञानदिवस’ म्हणून महाराष्ट्रात साजरा करणे हे एकप्रकारचे अभिवादनच होय. संयुक्त राष्ट्रसंघाने १५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाबासाहेबांचा ‘विश्‍वप्रणेता’ म्हणून गौरव केला. ७० वर्षाच्या राष्ट्रसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्या यादीत या महान भारतीयाला नेऊन बसविले. आणि बाबासाहेबांच्या जयंतीने हे सर्वश्रेष्ठ युद्ध जिंकले. अशा महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्‍वक्रांती नायकास त्रिशरण आणि पंचशीलेचे वंदन! …..जयभीम!!

….. गंगाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३.

You may also like

Popular News