अवैध दारू भट्ट्यांविरूध्द सिंदखेड पोलीसांची धडक मोहीम

एकाच दिवशी सहा ठिकाणी छापे

अवैध दारू विक्री संबंधातील मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिंदखेड पोलीसांनी तीन गावातील तब्बल सहा अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर छापेमारी करून हातभट्टी व देशी दारूचा मुद्देमाल हस्तगत केला असून छापेमारी केलेल्या सर्व ठिकाणच्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वा. च्या दरम्यान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांच्यासह पो.हे.कॉ. आप्पाराव राठोड, सानप, हेमंत मडावी, दारासिंग चौहाण, पो.नाईक फुलारी, पवार, गोपनवाड व पो.कॉ. हेमंत बिचकेवार, संजय शेंडे, गजानन नंदगावे, मेश्राम यांच्या पथकाने सारखणी येथील सकुबाई प्रमसिंग राठोड वय ५५ वर्षे यांच्या राहत्या घरी छापा टाकला. त्यात १५ लिटर हातभट्टीची दारू ज्याची अंदाजे किंमत १५०० रू. चा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला. सकाळी ९:१० वा.च्या दरम्यान सारखणी येथील वसराम उत्तम राठोड वय ३५ वर्षे यांच्या राहते घरी छापा टाकून १००० रू. किमतीची हातभट्टीची १० लिटर दारू इत्यादी मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला.

तर सकाळी ९:५० वा. चे दरम्यान सारखणी येथीलच कवशीबाई किशन राठोड वय ६० वर्षे यांच्या घरी छापा मारल्यानंतर हातभट्टीची १००० रू किमतीची १० लिटर दारू आढळून आल्याने म.दा.का अंतर्गत सारखणी येथील दोन महिलांसह तिनही आरोपीतांवर सिंदखेड पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून वरील तिनही प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ.आप्पाराव राठोड हे करीत आहेत. याच दरम्यान मौजे तुळशी येथील दिपक विजयसिंह ठाकूर यांच्या राहते घरी छापा टाकून १५०० रू किंमतीची १५ लिटर हातभट्टीची दारू आढळून आल्याने पो.उ.नि. संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पो.हे.कॉ.भारत राठोड हे करीत आहेत. तर मौजे करळगाव येथील प्रल्हाद मारोती धुर्वे वय ४५ व रंगराव नागोराव दालपे वय ३५ यांच्या राहत्या घरी छापा मारून देशी दारू (बॉबी-संत्रा) १८० मिली च्या अनुक्रमे १० व १२ अशा एकूण २२ बाटल्या सिंदखेड पोलीसांनी हस्तगत करून वरील आरोपीतांवर गुन्हा दाखल केला आहे.

“विशेष म्हणजे हातभट्ट्यांविरूध्दची सिंदखेड पोलीसांची धडक कार्यवाही कौतुकास्पद असली तरी… दररोज देशी दारूच्या बॉक्सचा अगदी घरपोच पुरवठा देशी दारू दुकानदारामार्फत होत असुनसुध्दा देशी दारूच्या केवळ २२ बाटल्या सापडणे ही बाब प्रत्यक्षदर्शींच्या पचनी न पडल्याने करळगाव येथे आज दिवसभरात उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यातच दारू विक्रेताच अवैध दारू विक्रेत्याच्या दिमतीला थेट धावून आल्याच्या चर्चाही चवीने झाल्या. तर काहींच्या मते देशी दारूच्या जप्त करण्यात आलेल्या बॉबी-संत्रा नामक बाटल्यांवरील स्टिकर उकरून टाकून त्यावर असलेला बँच नंबर पुर्णपणे मिटवून त्या नेमक्या कोणत्या ठिकाणावरून आल्या यासंबंधी पुरावा नष्ट करणे हाही सदर दारू विक्रेत्याची चाल असल्याची नागरीकांत चर्चा होती…. असे असले तरी येत्या १८ एप्रिल रोजी लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने गावोगावी देशी व विदेशी दारूचा महापुर येणार असल्याचे रात्री बारानंतर दुचाकीवरून जात असलेल्या बंदीस्त पार्सलवरून दिसून येते. यापासुन सिंदखेड पोलीस अनभिज्ञ असतील की कसे..? हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी १८ एप्रिल पर्यंतचा कालावधी हा मद्यपींसाठी “मद्यसप्ताह” असल्याने दरम्यानच्या काळात सिंदखेड पोलीसांची डोकेदुखीत लक्षणीय वाढ होईल. यात तिळमात्रही शंका नसल्याचे बोलल्या जात आहे…

……बाबाराव कंधारे,माहूर.

You may also like

Popular News