भारुड, गवळणी, लोककलेच्या सादरीकरणातून मतदान जागृती

जागृती बालकला मंचाचा उपक्रम; मतदारांचा बालकलाकारांना प्रतिसाद

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी संपन्न झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या तुलनेत सरासरी मतदानात एका टक्क्याची घसरणच झालेली दिसून आली. दुसर्‍या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी होत असून मतदान जनजागृतीचा दीप तेवत ठेवण्याच्या उद्देशाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील २८१ जवळा देशमुख येथे मतदान जनजागृतीची नवी शक्कल लढविण्यात आली. भारुड, गवळणी अशा लोककला प्रकारांचे सादरीकरण करुन मतदान जागृती करण्यात आली.

जागृती बालकला मंचाच्यावतीने कलापथकाची निर्मिती करण्यात येऊन मतदानाची टक्केवारी वाढलीच पाहिजे या उद्देशाने भारुड, गवळण, सवाल-जवाब अशा लोककलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. मनोरंजनातून प्रबोधन या उपक्रमाला मतदारांचा प्रतिसाद लाभला. यासाठी दिव्यांग मतदारांनाही सहभागी करुन घेण्यात आले. बालकला पथकातील साक्षी गच्चे, अक्षरा गोडबोले, गणेश मठपती, नंदिनी वाघमारे, अंजली गोमस्कर, मुस्कान पठाण, प्रथमेश टिमके, साक्षी झिंझाडे, पायल ढगे, विठ्ठल तोटकुलवार, अक्षरा शिंदे, गंगासागर शिखरे, संध्या गच्चे, संघमित्रा गच्चे आदी बालकलाकारांनी सहभाग घेतला.
‘मला बाई जायाचं मतदानाला,
मत देयाला लोकशाहीला
नेसली गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची
आवड मला मतदानाला जायाची,
दिवसभर घरातच बसून राही
मतदानाला ही बया जातच नाही,
असली सासू नको गं बाई,
जाऊ या जाऊ या जाऊ या
मतदान करायला जाऊया
अशा विविधरंगी व बहुढंगी लोककला प्रकारांचे कलापथकाने सादरीकरण करुन मतदारांचे लक्ष वेधले.

या उपक्रमासाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी एस.एम. घटकार यांनी पुढाकार घेतला. मतदानाला दोनच दिवस उरले असून या माध्यमातून बोरगांव, खडकमांजरी, बेटसांगवी, दगडगांव, वाहेगांव, पळशी अशा शेजारील गावातील बीएलओंच्या मदतीने मतदान जागृतीचा संदेश देण्यासाठी आनंद गोडबोले, दिपकसिंह गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे किशन गोडबोले, मिलींद गोडबोले, चांदू गोडबोले, पांडूरंग गच्चे, हैदर शेख, बालाजी झिंझाडे, बाबुमीयॉं पठाण, माधव मठपती, अंकुश शिखरे, सुभाष शिखरे, लिंगराम रेड्‌डी आदी प्रयत्नशील आहेत.

You may also like

Popular News