आठ लाखाची बॅग पळविणाऱ्या युवकाला पोलीस कोठडी

14 एप्रिलच्या रात्री 6 लाख 95 हजार 700 रुपयंाची बॅग धारदार खंजीरच्या धाकावर पळवून नेणाऱ्या युवकाला पोलिसांनी पाठलाग करुन त्वरित पकडल्याने संपूर्ण पैसे जप्त झाले. मुख्य न्यायदंडाधिकारी रविंद्र करंकाळ यांनी या दरोडेखोराला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

14 एप्रिलच्या रात्री नऊ वाजेच्या पुढच्या काळात प्रतिक जैन रा.जालना या व्यापाऱ्याकडून सतीश वैजनाथ परसवाळे रा.जुनाकौठा नांदेड यांनी त्यांच्याकडून व्यापारातील 6 लाख 95 हजार 700 रुपयांची बॅग घेवून काळीजी टेकडी येथील मल्लिाकार्जून महाजन यांच्या घराकडे जात असताना त्याच्या हातातील बॅग खंजीरचा धाक दाखवून एका युवकाने हिसकावून घेतली आणि तो जुनामोंढाकडे पळू लागला. सतीश परसवाळे हे सुध्दा त्याच्यामागे पळत होते. त्यावेळी जुनामोंढा वजिराबाद येथील कर्मचारी मधुकर टोणगे आणि जाधव कर्तव्यावर हजर होते. त्यांनी सुध्दा या पळणाऱ्या युवकाच्या पाठीमागे धावत त्याला पकडले. त्याच्याकडे बळजबरी चोरलेले 6 लाख 95 हजार 700 रुपये सोबतच एक धारदार खंजीर मिळून आला. सतीश परसवाळेच्या तक्रारीवरुन पकडलेला युवक प्रमोद उर्फ महेश रंगनाथ मानेकर (30) रा.जुनागंज नांदेड याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनात पेालीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.

आज 15 एप्रिल रोजी प्रविण पाटील, पोलीस कर्मचारी गजानन किडे, संजय जाधव यांनी प्रमोद मानेकरला मुख्य न्यायदंडाधिकारी रविंद्र करंकाळ यांच्यासमक्ष हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली ती न्यायालयाने एका दिवसासाठी मान्य केली आहे. याप्रकरणात पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी कौतुक करून 10 हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे.

You may also like

Popular News