खून आणि जीव घेणा हल्ला प्रकरणात तिसऱ्या आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी

मुसलमानवाडी येथे डॉक्टर व सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला आणि कौठा परिसरात एकाचा खून करुन गाडी पळविल्याप्रकरणात आज पोलिसांनी तिसरा आरोपी न्यायालयात हजर केला असतांना चौथ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास पाच दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील दोन जण उद्या दि.16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

8 एप्रिल रोजी मध्यरात्री 11.30 वाजेच्या सुमारास मुसलमानवाडी येथे डॉ.सतीश गायकवाड आणि त्याचा सहकारी मित्र बशीर पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन दोन युवक पळाले होते. या युवकांनी कौठा परिसरातील बॉम्ब शोधक व नाशक पथक कार्यालयाच्या समोर चारचाकी गाडी क्र.एमएच-24-एएस-8447 वर दगडफेक करुन ती गाडी थांबवली. त्या गाडीतील शेख नजीर अब्दुल गफार यास उजव्या काखेत गोळी मारुन त्याला खाली पाडून गाडी घेवून पळून गेले होते. या प्रकरणी त्यादिवशी गावातील असंख्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस अधीक्षक स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून होते. या गोळीबार प्रकरणातील आरोपी शुभंम राजकुमार सेलगुडे (20) आणि सुरजसिंघ जगजीतसिंघ गाडीवाले (22) या दोघांना पकडले होते. या आरोपी पकड भूमिकेत नांदेडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले असल्याची चर्चा खुद्द पोलीस दलात सुरु आहे. त्यावर मात्र अद्याप काही कार्यवाही झालेली नाही.

काल दि.14 एप्रिल रोजी पोलिसांनी शहरातील शिल्पेश राजेंद्रकुमार निळेकर (21) यास आपल्या ताब्यात घेतले होते आज दि.15 एप्रिल रोजी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक शेख जावेद, पोलीस कर्मचारी प्रभाकर मलोडे, सूर्याजी वडजे, फैयाज सिद्दीकी, अंकुश पवार आदींनी पकडलेल्या शिल्पेश निळेकरला न्यायालयासमक्ष हजर केले. या प्रकरणात शिल्पेशच्या बॅंक खात्यातून अगोदर पोलीस कोठडीत असलेला आरोपी शुभंम सेलगुडे याच्या खात्यावर 60 हजार रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यासंदर्भाची सर्व तपासणा करायची आहे तसेच या शिल्पेशने कोणाला तरी बंदुकीच्या आठ गोळ्या दिल्या आहेत त्या जप्त करायच्या आहेत, असा युक्तीवाद पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी केला.युक्तीवाद ऐकून न्यायाधीशांनी शिल्पेश निळेकरला पाच दिवस, 19 एप्रिल 2019 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे पेालीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणात तपासणी करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाचे कांही अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यांनी सुध्दा या प्रकरणातील दिल्ली येथे रहिवासी असलेला शुभम यास विचारपुस केल्याची खात्रीलायक माहिती आहे. जवळपास 3 ते 4 तास एटीएस अधिकाऱ्यांनी शुभमची विचारपुस केली आहे. निष्पन्न काय झाले याची मात्र माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणात होत असलेल्या पोलीस तपासानुसार फक्त गाडी पळविण्यासाठी जीव घेणा हल्ला व खून हा प्रकार घडला असेल यावर विश्र्वास बसत नाही. पोलीसांनी यातील सत्य शोधणे आणि त्यानुसार दोषींवर कार्यवाही करणे पोलीस दलाकडून अपेक्षीत आहेत.

You may also like

Popular News