डांबर घोटाळ्यातील कंत्राटदाराची पोलीस कोठडी वाढली

11 कोटी 82 लाखाच्या डांबर घोटाळा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसानंतर आज पुन्हा एकदा पाचव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवस पोलीस कोठडी वाढवली आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दाखल झालेल्या डांबर घोटाळा प्रकरणात एकूण सहा कंत्राटदार आरोपी होते. त्यातील महंमद मोईजोद्दीन महंमद सलिमोद्दीन या कंत्राटदाराला पोलिसांनी 12 एप्रिल 2019 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अटक केली. सायंकाळी चार वाजेच्यापूर्वी त्याला न्यायालयात हजर केले. त्यास न्यायालयाने 12 ते 15 एप्रिल अशी पोलीस कोठडी मंजूर केली होती. यापूर्वी पोलिसांनी तीन कंत्राटदारांना अटक केली होती. एकाला वैद्यकीय पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता आणि एकाविरुध्द सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानंतर त्याच्याबद्दल दोषमुक्ती अहवाल पोलिसांनी पाठविला होता.

आज 15 एप्रिल रोजी महंमद मोईजोद्दीनची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के, पोलीस उपनिरीक्षक यू.जी.उगले, पोलीस कर्मचारी दिलीप राठोड व शिवाजी नाईक यांनी त्यास न्यायालयात हजर केले. यावेळी अभिजीत फस्के यांनी आरोपीने पोलीस कोठडीच्या काळात योग्य मदत केली नाही म्हणून पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. सरकारी वकील ऍड.एस.एस.कळसकर यांनी आरोपीने बनावट डांबर चालान कुठे बनविले, कुणाकडून बनविले, त्यावर एचपीसीएलचा लोगो कसा वापरला याचा तपास करायचा आहे म्हणून पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. याप्रसंगी आरोपी महंमद मोईजोद्दीनच्या वतीने ऍड. रमेश परळकर यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसात पोलीस कोठडीच्या काळात तपासात काहीच प्रगती नाही तेंव्हा पोलीस कोठडी वाढवून देवू नये, असे सांगितले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीशानी महंमद मोईजोद्दीनची पोलीस कोठडी एका दिवसासाठी वाढवून दिली आहे.

You may also like

Popular News