आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय मैदाने गाजली

पीएम-सीएमसह डजनभर मंत्र्यांची जिल्ह्यात हजेरी

सार्वत्रिक 17 व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 31 मार्च 2019 पासून सुरू झाली. यात प्रमुख कॉंग्रेस आणि भाजप या दोन राजकीय पक्षांत जिल्ह्यातील मैदानावर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून भाजपच्या डजनभर मंत्र्यांनी जिल्ह्यातील मैदाने दणाणून सोडले. तर कॉंग्रेसकडून राहूल गांधीपासून अनेक स्टार प्रचारकांनी नांदेडात हजेरी लावली. आज दि. 16 रोज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

नांदेड जिल्ह्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागल आहे. विशेषत: 2014 मध्ये देशात मोदी यांची लाट असतानाही नांदेडची जागा कॉंग्रेसने राखली होती. ऐवढेच नसून 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसने आपला गड शाबूत ठेवला होता. नुकत्याच एक वर्षांखाली पार पडलेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला ना भुतो ना भविष्य असे बहुमत मिळाले. भारतीय जनता पार्टीने महापालिकेच्या निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी नांदेड लोकसभेच्या मैदानात शिवसेनेतून आलेल्या प्रता पराव पाटील चिखलीकरांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत सर्व कारभार मुख्यमंत्र्यांकडून पाहिले जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. भाजपकडून रेल्वेमंत्री पियुल गोयल, ना. रामदास आठवले, ना. बबनराव लोणीकर, केंद्रीय मंत्री पुरी, संभाजी पाटील निलंगेकर, ना. पंकजा मुंडे, ना. राम शिंदे, ना. माधव जाणकर, ना. सुधीर मुनगंटीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. निलेश नाईक यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यातील राजकीय मैदाने आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीने दणाणून सोडले होते. दि. 15 रोज सोमवारी दुपारी 2 वाजता बुद्धीवंतांशी संवाद साधण्यासाठी नितीन गडकरी यांनी बैठक शहरातील हॉटेलात ठेवण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे या बैठकीला ना. गडकरी उपस्थित न राह शकले.

तर कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी, माजी मंत्री गुलाम नबी आझाद, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बस्वराज पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ या नेत्यांनी जिल्ह्यातील अनेक भागात प्रचाराचा सभा घेऊन राजकीय वातावरण तापविले. याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून ऍड. बाळासाहेब आंबेडकर, खा. असदोद्दीन ओवेसी, तर समाजवादी पक्षाचे आ. अबु आजमी या नेत्यांनीही जिल्ह्यातील विविध भागात प्रचाराच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षीत केले. सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना विविध विकास कामांची माहिती सांगून तर विरोधकांकडून मागील पाच वर्षांत काळात झालेल्या कारभाराचा पाडा वाचून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. आज दि. 16 रोज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन अधिक भर द्यावा लागणार आहे. दि. 18 रोज गुरूवारी प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात होणार आहे. एकंदरीत जिल्ह्यात पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व डजनभर मंत्र्यांनी संपुर्ण नांदेड लोकसभा मतदार संघ ढवळून काढला.

You may also like

Popular News