BREAKING NEWS

logo

नांदेड, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने दरमहा 5 तारखेला आयोजित केल्या जाणा-या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामधील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहुन एमपीएससी टॉपर्सही भारावून गेले. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह तुंडुंब भरल्यानंतर  अगदी मान्यवरांच्या पायापर्यंत स्टेजवर बसलेले विद्यार्थी, सभागृहाच्या आत व  सभागृहाबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी पाहुन टॉपर्सनी कुतुहलासोबतच त्यांचे प्रती कृतज्ञता सुध्दा व्यक्त केली.

मनपा आयुक्त् गणेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनोहर भोळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, व्दितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलिस उपअधिक्षक या पदासाठी खेळाडू प्रवर्गातून प्रथम आलेले सुदर्शन पाटील, नांदेड येथे नुकतेच रुजू झालेले परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक प्रशांत ढोले,निवड झालेले पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले, तहसिलदार श्रीकांत निळे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अव्व्ल कारकून मीना सोलापूरे यांनी इतनी शक्ती हमे देना दाता या प्रेरणा गीताने केली. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी उज्ज्वल नांदेड मोहिमेचे आयोजन व साध्य झालेले यश व पुढील काळातील आयोजन याबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी यांनी विद्यार्थ्यांनी उज्व्ल नांदेडला दिलेल्या सहकार्याचे कौतूक करुन जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सदैव तयार असल्याचे अभिवचन दिले. मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची व ती पूर्ण होईस्तोर त्यांचा पाठलाग करुन,कष्ट करुन यशस्वी कसे व्हावे याबाबत महत्व्पूर्ण मार्गदर्शन केले. 

एमपीएससी टॉपर्स यांनी आपले अनुभव कथन करुन प्रतिकूल परिस्थितीमध्येही न डगमगता, अपयशाची तमा न बाळगता योग्य् पध्दतीने अभ्यासाचे नियोजन करुन यश कसे मिळवता येऊ शकते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यासोबतच नांदेड मध्ये असलेले शासकीय ग्रंथालय,सेतू समिती अभ्यासिका व उज्व्ल नांदेड अंतर्गत देण्यात येणा-या सुविधा यासारख्या बाबी महाराष्ट्रात कोठेही नसल्याचे नमूद करुन विद्यार्थ्यांनी याचा फायदा करुन घ्यावा असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनोहर भोळे यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जातांना कशा पध्दतीने सक्षमपणे सामोरे जावे याबाबत कराव्या लागणा-या उपाययोजना याविषयी माहिती देऊन मेहनतीसोबतच एखाद्या गुरुचे मार्गदर्शन आवश्य्क असल्याचे सांगून त्यांनी नजीकच्या काळात होणा-या परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एखादया सेलीब्रेटीस पाहण्यासाठी जशी झुंबड उडते तशी एमएपीएससी टॉपर्सना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी झुंबड केली होती. जो तो विद्यार्थी या टॉपर्स सोबत मोबाईलमध्ये फोटो,सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रताप सुर्यवंशी,शैलेश झरकर,आरती कोकुलवार, बाळू पावडे,संजय कर्वे, अजय वटटमवार,कोंडीबा गाडेवाड,रघुवीर श्रीरामवार, लक्ष्म्ण शेनेवाड,सोपान यनगुलवाड आदींनी सहकार्य केले. 

    Tags