BREAKING NEWS

logo

नांदेड, नांदेड-नागपूर राज्य महामार्गावरील अर्धापूर शहराच्या बाहेरून वळण रस्ता बनविण्यात आला होता. हा रस्ता अवघ्या एक वर्षांच्या आत खराब झाल्याच्या तक्रारी शासनाकडे असंख्य दाखल झाल्यानंतर  याची पाहणी करण्यासाठी मुंबई येथील गुणनियंत्रक दक्षता पथकाकडून शुक्रवारी पाहणी करण्यात आली.

नांदेड-नागपूर राज्य महामार्गावर अर्धापूर शहर वसले असून वाहतुकीची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणारी वर्दळ व शहरातून जात असल्याने या महामार्गावर अनेक किरकोळ अपघात हे नित्याचे झाले होते. यामुळे अर्धापूर शहराच्या बाहेरून वळण रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी अर्धापूर शहर वासियांकडून करण्यात आली होती. या मागणीच्या आधारे वसमत फाट्यापासून हा वळण रस्ता तयार करण्यात आला असून अंदाजीत हा रस्ता 4 कि.मी. अंतराचा असल्याचे सांगण्यात येते. या रस्त्यावर केंद्र शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी वापरण्यात आला. मात्र एक वर्षांच्या आत हा रस्ता उखडून गेल्याने या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले. या खड्‌ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या तर अनेकांना जीव गमवावा लागला. झालेल्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली. या  भागातील नागरिकांनी याची चौकशी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन या कामाची चौकशी करण्याची मागणी लाऊन धरली होती. या तक्रारीच्या आधारे राज्य शासनाने मुंबई येथील केंद्रीय दक्षता व गुण नियंत्रक पथकाचे अधीक्षक अभियंता चमलवार यांनी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी नांदेड येथे दाखल झाले. चमलवार यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची व डांबराची नमुने त्यांनी घेतले असून याबाबतची चौकशी सखोल केली जाणार असून या चौकशीदरम्यान जे दोषी आढळतील त्यांना कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी ज्या शाखाअभियंत्याची नेमणुक करण्यात आली होती त्यांची बदली झाली असून या चौकशीअंती त्यांचीही चौकशी करण्यात येणार असून या चौकशीदरम्यान दोषी आढळल्यास त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या अर्धापूर वळण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमीतता झाली असून या रस्त्याचे काम मुखेड येथील गुत्तेदारांनी केले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या गुत्तेदाराची चौकशी होऊन त्यांचेही नाव येणाऱ्या चौकशीसाठी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदरीत यात किती जणांचे विकेट पडणार हे आता अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतरच समोर येणार आहे.

    Tags