BREAKING NEWS

logo

नांदेड, परीक्षेत मिळणार्‍या टक्केवारी संदर्भात पालकांनी मुलांकडून फाजील अपेक्षा न करता त्याच्या पुढील यशस्वी वाटचाली आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव ठेवावी, असा सल्ला नांदेड मनपाचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांनी दिला.

मालेगाव रोडवरील यशोदीप कोचिंग क्लासेसच्यावतीने रविवारी दुर्वांकुर फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना कंदेवार यांनी मुलांना घडविण्यात शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी पालकांचीही आहे, असे  सांगितले. महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून किंवा पुस्तकांसाठी मुलांना पैसे देवून जबाबदारी झटकून चालणार नाही, तर घरी आपण त्याच्यासाठी किती वेळ देतो, त्याच्या अभ्यासाकडे किती लक्ष ठेवतो, ही जबाबदारी पालकांची आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे त्याने मिळविलेल्या टक्केवारीचे आपण कौतुकच करायला शिकले पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदाबाई राठोड होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक संचालक लेखा परीक्षण शिवप्रसाद जटाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. रेखा कदम, लेखाधिकारी अमोल आगळे, इतवाराचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे यांची उपस्थिती होती. सहाय्यक संचालक लेखा परीक्षण शिवप्रसाद जटाळे यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्स देवून यशस्वी होण्याचा सोपा मार्ग सांगितला. सौ. रेखा कदम यांनी क्लासेसच्या या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुलींप्रमाणे मुलांनाही यशस्वी होवून क्लासेसचे नांव उज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. ध्येय निश्चिती आणि अभ्यास यासाठी नियोजन अतिशय महत्वाचे आहे, असे मार्गदर्शन लेखाधिकारी एसएसए नांदेड अमोल आगळे यांनी केले.

क्लासेसच्या संचालिका सौ. सुनिता राजाराम राठोड यांनी यशोदीप कोचिंग क्लासेसच्या प्रगतीचा आलेख सांगताना यावर्षीपासून पालकांच्या आग्रहास्तव लहान मुलांसाठी शाळा सुरु केल्याची माहिती दिली. या सोहळ्यात इयत्ता दहावीत सर्वप्रथम आलेल्या व गणित विषयात 100 पैकी 100 गुण पटकावलेल्या कु.त्रिवेणी शेटोड (96 टक्के) या विद्यार्थीनीचा रोख 11 हजार रुपये, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. शिवाय क्लासेसच्या इयत्ता पाचवी ते दहावी आणि विविध स्पर्धा परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थीनींचाही पालकासह मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांच्याहस्ते क्लासेसच्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. बालाजी क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    Tags