logo

नांदेड, अन्न सुरक्षा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वितरीत करण्यात येणारे रॉकेल, साखर व खाद्य तेल बंद केले आहे. सरकारच्या धोरणा विरुध्द आवाज उठविण्यासाठी ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने दि.18 जुलै रोजी रामलीला मैदान ते संसदभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात दिली. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत रोख सबसिडी देवून स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय करण्याचे जाचक निर्णय केंद्र सरकार घेत आहे. जीवनावश्यक वस्तुच्या वाढत्या भाववाढीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. परंतु जनतेने आंदोलन करुन मिळविलेला अन्न सुरक्षा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. स्पॅस मशिन व बायोमॅट्रिक प्रणाली लागू करतांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांच्या हिताविरुध्द निर्णय घेतले आहेत. स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे रॉकेल व साखर सुरु करावी, दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी व अन्य मागण्यांसाठी देशातील स्वस्त धान्य दुकानदारांचा भव्य मोर्चा दि.18 जुलै रोजी रामलीला मैदान ते संसदभवनावर काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशातुन जवळपास पाच लाख स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होणार असल्याचे देवानंद सरोदे यांनी म्हटले आहे. संसदेवरील मोर्चात नांदेड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विजय सोनवणे, सुभाष काटकांबळे, देवानंद सरोदे, रमेश गांजापूरकर, अशोक कापसीकर, मारोती हनवते, राजाभाऊ कुलकर्णी, साहेबराव नरवाडे, डी.वाय. मिसाळ, डी.एच. गबाळे, प्रताप गजभारे, रमा तिवाडी, कमलबाई लांडगे, माला प्रधान, शेख मुस्तफा, बालाजी भोकरे, धनराज मांजरमकर, राहुल जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकात केले आहे.

    Tags