logo

नांदेड, खास प्रतिनिधी/ आपल्या पुत्रासह पत्नी आणि भावाचा खून करणाऱ्यास बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश आनंद पाटील यांनी जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. मारेकऱ्याला आपल्या पत्नीचे आणि भावाचे अनैतिक संबंध आहेत असा संशय होता.

नारायण रामकिसन तोडे रा. आंतरगाव ता. बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील प्रल्हाद लक्ष्मन तोडे वय 45 वर्ष हा आपली पत्नी गयाबाई प्रल्हाद तोडे वय 40 वर्षे व आपला भाऊ अशोक  लक्ष्मन  तोडे वय 42 याच्यांत अनैतिक संबध असल्याचा संशय गेल्या अनेक महिन्यापासून घेत होता. दि.9 जुलै 2015 रोजी राञी अंदाजे 10 ते 11 वाजेदरम्यान पत्नी गयाबाई तोडे,मुलगा हणमंत प्रल्हाद तोडे वय 11 वर्षे हे स्वतःच्या घरी गाढ झोपेत असताना पहिल्यांदा पत्नी वर कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचे डोके व धड वेगळे केले.व आईजवळच झोपलेल्या 11 वर्षीय आपल्या पोटच्या मुलावर याच कुऱ्हाडीने वार करून ठार केले.त्यानंतर लगेच घराचे दार बाहेरून बंद करून शेताच्या आखाड्यात झोपलेल्या आपल्या भावाकडे मोर्चा वळवला.तेथे पोहचताच भाऊ अशोक तोडे याचेवरही त्याच कुऱ्हाडीने वार करून त्यासही जाग्यावर ठार केले. अशात जवळच झोपलेला आपला पुतण्या नारायण रामकिशन तोडे वय 30 वर्षे याने काका हे काय करताय ? असे उठून विचारले असता त्याच्याही अंगावर मारावयास जाताच पुतण्याने जवळच आसलेला सालगडी सखाराम यास सोबत घेऊन तेथून पळ काढला. यानंतर आरोपी प्रल्हाद तोडे याने विषारी द्रव प्रशान केले. यानंतर घटनास्थळी आलेल्या काही लोकांनी प्रल्हाद यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

आलेल्या तक्रारीनुसार कुंटूर प्रल्हाद तोडे याचेवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302,307, 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक संतोष पाटील,संजय गायकवाड,पोलीस उप निरीक्षक चव्हाण यांनी केला. त्यांना पोलिस कर्मचारी  मारोती भोळे, अशोक दामोधर, बी.व्ही.राठोड, भगवान कोतापल्ले, गजानन कदम, एस.एन.सांगवीकर  यांनी मदत केली. पाटील यांनी तपास करून दोषारोप पञ न्यायालयात दाखल केले. यामध्ये एकूण 14 साक्षीदाराःची साक्ष तपासण्यात येऊन न्यायमुर्ती आनंद पाटील यांनी आरोपी प्रल्हाद लक्ष्मन तोडे याचेवर आरोप सिद्ध झाल्याच्या कारणाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड.दिलीप कुलकर्णी बोमणाळीकर यांनी बाजू मांडली. आरोपीच्यावतीने ऍड. बिलोलीकर यांनी काम पाहिले.

    Tags