logo

BREAKING NEWS

पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, देगलूर पोलीस ठाण्याचे अनिल गायकवाड यांचा उपक्रम

सोशल मिडीयाच्या माध्यमातून उपदेशाचे डोस अनेकजण पाजवत असतात. झाडे लावा, थंडीची काळजी घ्या, पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करा, जनावरांसाठी पाणी ठेवा अशा अनेक उपदेशाचे डोस पाजण्याचे काम होत असते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणारे कमीच. पण नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील पोलीस ठाणे त्याला उपवाद ठरले असून, ठाण्याच्या परिसरातील २५ झाडावर व परिसरात चिमणी पाखरे व पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी पुढाकार घेवून त्याची अंमलबजावणी केली.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोसमात तसेच वेगवेगळ्या काळात अनेक संदेश आवाहन आपण वाचत असतो. पावसाळ्याच्या काळात झाडे लावा, अन्यथा वेळ वाया जाईल, उन्हाळ्यात गोरगरीबांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, भर उन्हाळ्यात पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करा, भटक्या जनावरांना पाणी द्या, हिवाळ्यात थंडीचे संरक्षण करा अशा उपदेशाचे डोस या माध्यमातून अनेकजण पाजत असतात. मात्र प्रत्यक्षात त्याची कृती करताना कमी जणांचा पुढाकार असतो.  उपदेशाचे डोस पाजून व व्हॉटसअपच्या माध्यमातून असलेल्या सर्व ग्रुपमध्ये एकदाच टाकून द्यायचे व मोकळे व्हायचे ही भूमिका अनेकांची असते. नांदेड जिल्ह्याचे तापमान ४४ अंशापर्यंत गेल्यानंतर माणसाचे तर हाल होतच आहेत, मात्र पशुपक्षी, प्राणी यांनाही उष्णतेच्या झळा पोहंचत आहेत. याची जाणीव ठेवून देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी परिसरातील पक्षांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या समवेत सहायक पोलीस निरीक्षक गिते, फौजदार क्षीरसागर, जमादार, पोलीस कर्मचारी विठ्ठल शेळके, गणपत शेळके आणि शिंदे यांनी त्यांना साथ दिली. मडक्याचे छोटे बोळके, त्याला दोरीचा आधार व त्यात थंड पाणी टाकून ते झाडावर लटकविण्याचा प्रयोग गेली दोन दिवसांपासून त्या परिसरात सुरु आहे. जवळपास २५ झाडांवर व परिसरातील दहा ओट्यावर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या मुक्या पक्षांना याचा आधार झाला आहे. पोलिसातील ही माणुसकी व हा उपक्रम देगलूर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 

    Tags