logo

BREAKING NEWS

देगलूर सरपंच संघटनेच्या निवडणुकीत देशमुखाचा पराभव तर पाटलाचा विजय

नांदेड, प्रतिनिधी/ देगलूर तालुका सरपंच संघटना अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत हानेगावचे सरपंच प्रशांत देशमुख यांचा दारुण पराभव करुन भोकसखेडा येथील तरुणतडफदार सरपंच प्रशांत पाटील हे 38 मते घेवून विजयी झाले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण देगलूर तालुक्याचे लक्ष लागले होते.

देगलूर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती वलकले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेला तालुक्यातील जवळपास 58 सरपंच उपस्थित होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपसभापती वलकले यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसच्या पुढार्‍यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तालुका अध्यक्षपदाच्या एका नावावर एकमत न झाल्यामुळे सायंकाळी गुप्त मतदान घेवून निवड करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत निवडणुक प्रक्रिया पार पडली.

काँग्रेसचे युवा नेते व माजी पं.स.सदस्य अ‍ॅड. प्रितम देशमुख हानेगांवकर यांचे बंधू सरपंच प्रशांत देशमुख, देगलूर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव देशमुख बळेगांवकर यांचे कट्टर समर्थक भोकसखेडाचे सरपंच प्रशांत पाटील व वन्नाळीचे सरपंच रमेश पाटील या तीन जणांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. गुप्तमतदानाव्दारे पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत प्रशांत पाटील भोकसखेडकर यांना 38 मते पडली. हनेगांवचे प्रशांत देशमुख यांना 8 तर वन्नाळीचे रमेश पाटील यांना 9 मते पडली. सरपंच संघटना अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेतून तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीवर सभापती शिवाजीराव देशमुख बळेगांवकर यांचे वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे. खर्‍या अर्थाने काँग्रेसच्याच दोन देशमुखांत ही निवडणूक झाली. हानेगांवच्या देशमुखांवर बळेगांवकरांनी मात केल्याची बोलकी प्रतिक्रिया अनेकांनी या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

    Tags