logo

नांदेड, जिल्ह्यातील पोलिस दल आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी कडक पावले उचलली असून यात जिल्ह्यातील सात पोलिस स्टेशन स्मार्ट करण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.

पोलिस दल आधुनिक आणि सक्षमीकरण होण्यासाठी व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ऐवढेच नसून जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर लगाम घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या निगराणीखाली विशेष पथक स्थापन केले. या पथकाने एका महिन्यात तब्बल 5 कोटींच्या जवळपास मुद्देमालासह जप्त केले आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबरोबरच नांदेड शहरातील वाहतुक व्यवस्थेला चांगलाच चपराक बसला आहे. नुकतेच गृहराज्यमंत्री नांदेड दौऱ्यावर येऊन गेले असता त्यांनी नांदेड पोलिस विभागाची प्रशंसा केली व भविष्यात नांदेड पोलिस राज्यात एक नंबर होणार असल्याचे  संकेतही त्यांनी यावेळी देऊन गेले होते. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील 7 पोलिस स्टेशन स्मार्ट करण्यासाठी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दि. 5 रोज बुधवारी सकाळी 11 वाजता पोलिस मुख्यालय येथे त्या-त्या ठाण्याचे ठाणेप्रमुख व उपविभागीय अधिकारी यांची बैठक बोलाविली आहे.

यामध्ये शहरातील शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा, भाग्यनगर तर ग्रामीण भागातून देगलूर, भोकर आणि हदगाव ही 7 पोलिस स्टेशन स्मार्ट करण्यासाठी निवडली आहेत. पोलिस महासंचालक यांच्या आदेशानुसार इंडेक्स ऑफ सेफ्टी रसेप्शन याअंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या आतापर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे आणि अविनाश बारगळ यांच्याकडे तात्काळ सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीवर आळा, फरार आरोपी, शोध मोहिम, पाहिजे असलेले आरोपी ताब्यात घेणे, त्या-त्या पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय व गुन्हेगारीचे प्रमाण कमी या गोष्टी या स्मार्ट होण्यामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत. यामुळे निवडलेल्या सातही पोलिस स्टेशनच्या रंगरंगोटीचे काम, ऑनलाईन तक्रारी नोंदणी यासर्व गोष्टींची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

    Tags