Breaking news

संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफा रोखला

देगलुर(प्रतिनिधी)शिवरायांच्या महाराष्ट्रात मौजे कोपर्डी ता. कर्जत जि. अहमदनगर येथील गरीब मराठा शेतकरी कुटुंबातील शाळकरी अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व तिच्या निघृन हत्त्येमुळे संपूर्ण राज्यातील सूज्ञ नागरिक विशेषत: महिलावर्गामध्ये तीव्र संताप व आक्रोशाची भावना आहे. कोपर्डी घटनेचा व त्याचबरोबर महाराष्ट्रात व देशात कोणत्याही जाती जमातीचा वा धर्माच्या मुली-महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा आम्ही जाहीर निषेध करून त्यापोटी मराठा समाजाची संवेदना व्यक्त करतो. कोपर्डी येथील घटनेनंतर प्रत्येक जिल्ह्यात ५ लाखापासून ते ४० लाखापर्यंत मराठा समाज बांधवांचे महामोर्चे विविध मागण्यांसाठी निघाले. केंद्र व राज्य सरकारने गेल्या २५ ते ३० वर्षामध्ये आखलेली धोरणे, धोरणानुसार पारित केलेले कायदे व नियमामुळे राज्यात सकल मराठा समाजावर अन्याय झाला आहे, अशी सार्वत्रिक भावना आहे. यातूनच विविध मागण्या घेऊन मोर्चे निघत आहेत.

देगलूर नगर पालिकेच्या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री फडनवीस यांची जाहीर प्रचार सभा देगलूर नगरीत होती. यावेळी देगलुर मध्ये संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या युवक युवतींनी मुख्यमंत्र्यांच्या ताफा रोखला व मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी मराठा मागण्यांच्या संदर्भात १५ ते २० मिनिटे योग्य ती चर्चा केली. मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील तिन्ही आरोपींच्या विरोधात शिघ्र गतीने फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती झाली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमीत करणे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सिमीत करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था निर्माण करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेती मालास हमीभाव द्यावा. या व इतर संबंधित सर्व मागण्यांवर सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही तर येत्या विधीमंडळ अधिवेशनात नागपूर येथे व राजधानी मुंबई येथे देखील सकल मराठा समाज मोठ्या तीव्रतेने मोर्चा काढेल. नागपूर अधिवेशनापर्यंत न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, रणजित इंगोले, राजू मलकापूरकर, बालाजी आगलावे, सुनील कोठारे, बालाजी कोसंबे, राहुल थडके, योगेश पाटील, शंकर इंगोले, बालाजी डुकरे, गणेश कोसंबे, प्रमोद गवंडगावकर, जिजाऊ ब्रिगेडच्या सई इंगोले, श्रद्धा पाटील, आसावरी डोंगळे, शुभांगी आगलावे, मनीषा बोडके, आश्विनी पाटील, पूजा कोसंबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Photos