Breaking news

लाच प्रकरणातून दुय्यम उपनिबंधकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)धर्माबाद येथील उपनिबंधक कार्यालयातील दुय्यम उपनिबंधक विनोद पद्मवार यांची ‘लाच’ प्रकरणी दाखल झालेल्या आरोपातून सक्षम पुराव्याच्या अभावामुळे बिलोली सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विनोद पद्मवार यांची प्रसिद्ध विधिज्ज्ञ अ‍ॅड.प्रकाश टोम्पे यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली.

या निकालपत्रातील सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद येथील उपनिबंधक कार्यालयातील दुय्यम उप निबंधक विनोद पद्मवार यांच्या विरूद्ध रत्नाळी ता. धर्माबाद येथील मुद्रांक विव्रेता मुस्ताक अली पिता अहेमद अली यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मुस्ताक अली अहेमद अली यांनी दि.5/4/2014 रोजी दिलेल्या फिर्यादीत त्यांचा मुद्रांक विक्री परवाना क्र. 3411002 नुतनीकरणासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे विहित नमुन्यात विनंती अर्ज सादर केला होता. दुय्यम उप निबंधक विनोद पद्मवार यांच्यामार्फत पाठवण्यात आला होता आणि सदर मुद्रांक विक्री परवाना नुतनीकरणानंतर धर्माबादच्या उप निबंधक कार्यालयातून मला प्राप्त झाला असेही या फिर्यादीत म्हटले होते.

मद्रांक विक्री परवाना नुतनीकरण होऊन प्राप्त झाल्यानंतर दुय्यम उप निबंधक विनोद पद्मवार यांनी ‘नुतनीकरणानंतर का भेटला नाहीत. नुतनीकरणासाठी मागितलेले 2000 रूपये न देता निघुन गेलात. तुम्हाला 2000 रूपये द्यावेच लागतील, नाहीतर तुमच्याकडचे बॉण्ड विक्री रजिस्टर जमा करून घेणार नाही. तसेच लायसन्स केव्हाही रद्द करू शकतो. अशी पद्मवार यांनी धमकी देवून 2000 रूपये लाचेची मागणी केली, असे बॉण्ड विव्रेता मुश्ताक अली यांनी तक्रारीत नमूद केले.

सदर फिर्यादीवरून पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय,नांदेड मार्फत विनोद पद्मवार यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून बिलोली सत्र न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. बिलोली सत्र न्यायाधीश आनंद पाटील यांच्या न्यायासनासमोर सदर प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. या प्रकरणी आरोपी दुय्यम उप निबंधक विनोद पद्मवार यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळून आला नाही, त्यामुळे विनोद पद्मवार यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात विनोद पद्मवार यांची भक्कम बाजू प्रसिद्ध विधिज्ज्ञ अ‍ॅड. प्रकाश टोम्पे यांनी काम पाहिले.

Related Photos