आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात देगलूर पोलिसांना यश

नांदेड(प्रतिनिधी)देगलूर पोलीस स्टेशन हद्दित आठ घरफोड्या करून जवळपास साडेतीन लाखाचे दागिने, रोख रक्कम आणि साहित्य लंपास करणार्‍या तीन अट्टल चोरट्यांचा देगलूर पोलिसांनी शोध लावला असून पोलीस अधीक्षकांसह अप्पर अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांनी ठाण्याचे प्रमुख श्री. गुरमे व त्यांच्या सहकार्‍यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शेख ईसाक शेख जब्बार (रा. गौतमनगर), प्रल्हाद काशेटवार (जुना बसस्थानक), बालाजी बाचे (रा. लाईनगल्ली), रावसाहेब ठाणेकर (रा. देगाव रोड), अब्दुल मन्नान अ. सलीम (रा. जवाहर क्लब) यांची घरे व किराणा दुकाने फोडून गत महिन्यात लाखोंचा ऐवज पळविल्याने प्रचंड खळबळ माजली होती. योगायोग असा की, या दरम्यान कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक श्री. गुरमे रजेवर होते. अशाच प्रकारची चोरी ग्रामीण भागातील मरीबा कांबळै (रा. करडखेडवाडी), शेषराव येलटवार, लक्ष्मण वलपावडे (रा. चैनपूर) यांच्याकडे झाली होती. तपास मात्र शून्य होता.

पोलीस निरीक्षक श्री. गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकाने या गुन्ह्याचे गुढ उकलून अनिल शंकर चव्हाण (रा. तमलूर), पिराजी हाणमंत मागीरवार, राजु मारोती मागीरवार यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दागिने, रोख रक्कम व किराणा सामान याचा समावेश आहे. आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आरोपींना अटक करण्याच्या पथकात खुद्द श्री. गुरमे, पोलीस उपनिरीक्षक एम.जी. वाघमारे, पोहेकॉं. पठाण, पोना. दिपक जोगे, पोकॉं. चंद्रप्रकाश गायकवाड, पोकॉं. विठ्ठल शेळके, संजय यमलवाड, शिवानंद तेजबंद यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे, अप्पर अधीक्षक श्री. डोईफोडे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी देगलूर पोलिसांचे अभिनंदन केले. पाोलिसांच्या कामगिरीमुळे समाधान व्यक्त केलं जात आहे.

Related Photos