Breaking news

बालिकेच्या मृत्यू प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल : बिलोली बंद

नांदेड(खास प्रतिनिधी)येथील आंतर भारती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणारी कु. वैष्णवी उर्फ शिवाणी विरभद्र हांडे या विद्यार्थिनीने दि. 15 फेब्रुवारी रोजी नराधाम शिक्षकाच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. शैक्षणिक क्षेत्रात माणुसकीला काळीमा फासवणाऱ्या फरार आरोपीस अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यात यावा व या घटनेच्या निषेधार्थ बिलोली शहरवासीयांचा तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडकला निषेध मोर्चा.

गांधीनगर बिलोली येथील आंतरभारती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणारी कु. वैष्णवी उर्फ शिवाणी विरभद्र हांडे रा. गांधीनगर बिलोली हिने दि. 15 फेब्रुवारी रोजी 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी छतास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मयत विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवून आपली जीवन यात्रा संपविली. त्या चिठ्ठीच्या आधारे मयतेचे पिता विरभद्र हांडे यांनी काल दि. 20 रोजी बिलोली पोलिसांत आरोपी राजेश देवराव कागडे ह.मु. गांधीनगर बिलोली रा. मंगनाळी ता. धर्माबाद याच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्या चिठ्ठीच्या आधारे या विद्यालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या नराधाम शिक्षक खाजगी शिकवणीचे वर्ग चालवत होता. सदरची मयत विद्यार्थिनी याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. हा नराधाम गेल्या अनेक दिवसांपासून तिला वाईट हेतूने वर्तन करीत मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे समोर आले. त्या नराधमाच्या कृत्याच्या त्रासाला कंटाळून तिने शेवटी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेबाबत तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात असून आज शहरवासियांनी बिलोली बंदची हाक देऊन कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध करीत हजारोंच्या संख्येने बसस्थानकापासून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा धडकला. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोनि सुरेश दळवी यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला. या घटनेप्रकरणी बिलोली पोलिसांत आरोपी राजेश देवराव कागडे विरूद्ध 306 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोनि एस. एस. दळवी हे करीत आहेत. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साठे यांना देण्यात आले. सदर मोर्चात माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, माजी उपसभापती उमाकांत गोपछडे, नगरसेवक अनुप अंकोशकर, उत्तम जेठे, प्रकाश पोवाडे, शंकर आवलगे, यशवंत गादगे, मनोहर बसवते, शांतेश्वर पाटील, काशीनाथ कोंडलवाडे, ओमप्रकाश पाटील, मुन्ना पोवाडे यांच्यासह हजारो महिला, पुरूष सहभागी होते.

Related Photos