नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील मार्गावरून पायी चालणारा वाहनाच्या धडकेत ठार

नांदेड(खास प्रतिनिधी)बिलोली येथील नगर परिषदेच्या नुतन कार्यालयासमोरील राज्य महामार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यास 8 मार्च रोजी अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या संजय सोनकांबळे (30) यांचा नांदेड येथील रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

बिलोली येथील चौधरी फोटो स्टुडीओमध्ये फोटोग्राफरचे काम करणारे संजय चंद्रकांत सोनकांबळे (30) रा.आरळी हे दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी गावाकडे जात होते. नगर परिषदेच्या नूतन इमारतीसमोरून पायी जात असतांना मागून येणाऱ्या दुचाकीने संजय सोनकांबळे यांना जबर धडक देवून पलायन केले. जबर धडकेत रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या संजय यास नागरीकांनी उचलून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. परंतु नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचार चालू असतांना रात्री दहाच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. वास्तवीक पहाता शहरात व परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून, पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने घेवून जुना व नविन बसस्थानक परीसरात वाहतूक पोलीसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. सदरील प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली नव्हती.

Related Photos