logo

आपण नेहमी म्हणतो कि, स्त्रियांना संरक्षण मिळाले पाहिजे, त्यांचे पालन-पोषण व्यवस्थित करायला हवे, परंतु अनेक दुर्गम भागामध्ये तसे घडत नाही, स्त्रीयांना मान दिला जात नाही, त्यांच्या कुटुंबातील सर्वचजण मोल-मजुरी करून कष्ट करून जीवन जगत असतात, अनेकदा तेथील बायकांना चांगली वागणूक मिळत नाही, गुलामगिरी पद्धतीने त्यांच्याकडून नको ती कामे करून घेतली जातात, त्यांना लाजिरवाणे जीवन जगावे लागते, हि गुलामगिरीची जाणीव एका गावातील मुलीला होते आणि ती क्रांती करून उठते,,,ह्या मध्यवर्ती कल्पनेवर टी एच फिल्म्स निर्मित अनिल गावंडे प्रस्तुत " झरी " ह्या चित्रपटातची निर्मिती तुकाराम बिडकर, राधा बिडकर, कुंदन ढाके यांनी केली असून कथा-पटकथा-संवाद-दिगदर्शन राजू वाघमारे यांचे आहे, छायाचित्रणाची जबादारी श्यामल चक्रवर्ती यांनी सांभाळलेली आहे, विठ्ठल वाघ, अनंत खेळकर, किशोर बळी यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीत दिले आहे, या मध्ये नम्रता गायकवाड, मिलिंद शिंदे, अनिकेत केळकर, तुकाराम बिडकर, कमलेश सावंत, नागेश भोसले, अनंत जोग, निशा परुळेकर अश्या अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

कथा आहे झरी नावाच्या मुलीची,,,, डोंगरकडेकपारी असलेल्या घनदाट जंगलामध्ये अनेक कुटुंबे वस्ती करून राहत असतात, त्यांच्या मधील एका कुटुंबात झरी राहत असते, डोंगरमाथ्यावर जंगलामधील जीवन जगताना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागते, कामधंदा मिळण्याचे साधन म्हणजे तेथील ठेकेदार श्याम रेड्डी यांनी घेतलेल्या विविध कामावर मोल-मजुरी करून गुजराण करीत राहणे,  श्याम रेड्डी हा स्त्रीलंपट असल्याने तेथील अनेक मोल-मजुरी करणाऱ्या स्त्रियांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, अनेकवेळा कुमारी माता बनण्याची वेळ त्या स्त्रियांवर येते, पण झरी मात्र त्याच्या विरोधात उभी असते, एक दिवस संधी साधून तो झरी ला पळवून आणण्याचा घाट घालतो पण तो सफल होत नाही कारण त्याचवेळी तेथे शहरातून महेश नावाचा सिव्हिल इंजिनिअर जंगलात रस्ते बनविण्याच्या कामा साठी सरकारी ड्युटीवर आलेला असतो त्याची झरीशी गाठ-भेट होते, महेश ह्या गुलामगिरीतून आपली सुटका करील काहीतरी मार्ग काढील असे झरीला वाटते, गावातील लोकांना जास्त मेहतांना देऊन कामावर ठेवतो, श्याम रेड्डी चे नुकसान होऊ लागते तो स्थानिक पुढारी नाथू कवडा ह्यांच्या मार्फत समजोता घडवून आणतो,

महेश आणि झरीचे एकमेकांवर प्रेम जडते पण शेवटी महेश शयाम रेड्डीच्या वळणावर जातो, आता दोघेजण तेथील गावकऱ्यांचे शोषण करीत असतानाच वितू जिवत्या हा सामाजिक कार्यकर्ता गावकऱ्यांना मदत करायला येतो. झरी आणि गावकरी त्याला सहकार्य करतात पण, पुढे त्यांच्यापुढे नियतीने वेगळेच काही वाढून ठेवलेले असते. वितु जिवत्याचे नेमके पुढे काय होते ? श्याम रेड्डी आणि महेश यांना त्यांनी केलेल्या कर्माची फळे मिळतात का ? झरी पुढे जीवनात कोणता मार्ग स्वीकारते ? ती कालांतराने गावकऱ्यांचे रक्षण करू शकते का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या सिनेमात मिळतील.

झरीची मध्यवर्ती भूमिका नम्रता गायकवाड हिने अत्यंत ताकदीने केली आहे, झरीचे दुःख, तिचा संताप, इत्यादी विविध भावना सुरेख व्यक्त केल्या आहेत, मिलिंद शिंदे ने शयाम रेड्डी हा खलनायक छान रंगविला आहे, झरीचे वडील देवा, हि भूमिका तुकाराम बिडकर यांनी अत्यंत संयमाने सादर केली आहे ते त्यामुळे लक्षांत राहतात, ह्याशिवाय अनिकेत (महेश), कमलेश सावंत [ वितु जिवत्या ], नागेश भोसले [ नाथू कवडा ], अनंत जोग [ मुख्यमंत्री ], निशा परुळेकर [ कांती ] यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे, विषय चांगला प्रबोधन करणारा असून चित्रपट अनेक ठिकाणी रेंगाळत पुढे सरकतो, नाटयपूर्ण बनविण्याचा प्रयत्न दिगदर्शकानी केलेला जाणवतो पण त्याचा योग्यतो प्रभाव पडत नाही, पण सर्वांनी मनापासून निर्मिती केली असल्याची जाणवते, आता बाकी प्रेक्षकच ठरवतील.

    Tags