logo

पुणे, सर्वाना घायाळ करून सोडणाऱ्या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ६६.४० टक्के गुण मिळाले असून, कन्नड चित्रपटाची शूटिंग करताना तिने दहावीचा अभ्यास करून परीक्षा दिली होती हे विशेष.

'मराठीत सांगितलेले कळत नाय, इंग्रजीत सांगू?', असा 'डायलॉग' सतत मारणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळतात, याचीही अनेकांना उत्सुकता होती. तिथेही ती 'फर्स्ट क्लास'जवळ पोहोचली आहे. तिला इंग्रजीत ५९ गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने सिनेसृष्टीला याड लावले होते. बॉक्स ऑफिसवर 'झिंगाट' कामगिरी करत हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. त्यातील आर्ची आणि परश्याची जोडी तर 'सुपरडुपर हिट' झाली होती. आर्चीने तरुणाईला घायाळ केले होते. ती जिथे जाईल, तिथे चाहत्यांची झुंबड उडत होती. अशा परिस्थितीत तिला रोज शाळेत जाणं शक्यच होत नव्हते. त्यामुळे दहावीची परीक्षा बाहेरून देण्याचा निर्णय तिनं घेतला होता.

नववीच्या परीक्षेत रिंकूला ८१.६० टक्के गुण मिळाले होते. या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. स्वाभाविकच, तिच्या दहावीच्या निकालाबद्दलही प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मीडियावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर, आर्चीने दहावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मध्ये येण्याचा मान मिळविला आहे. कन्नड भाषेतील सैराटचे शूटिंग सांभाळून रिंकूने दहावीचा अभ्यास केला होता. त्यामुळे तिचे हे यश नक्कीच उल्लेखनीय, प्रशंसनीय आहे, अशी शाबासकीची थाप तिच्या शाळेतील शिक्षकांनी दिली आहे.

    Tags