LOGO

क्वीन मेकर, बुद्धी आणि भावनांचा नाटयमय संघर्ष

दीनानाथ घारपुरे, ९९३०११२९९७ - 2017-06-15 12:30:57 - 75

स्वभाव हा एक वेगळा पैलू असतो, स्वभावाप्रमाणे आपल्या जीवनाची जडण-घडण होत असते, स्वभाव हा माणसाला मिळालेला शाप आहे कि वरदान हे कोणीच सांगू शकत नाही, विविध स्वभाव वैशिष्ठये असलेली माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो, स्वभावामुळे त्या व्यक्तीची वृत्ती बनत असते, क्वीन मेकर मध्ये विविध स्वभावाच्या मनोवृत्तीच्या व्यक्तिरेखा पाहायला मिळतील,

माणूस जर स्वतःचा विचार करणारा आणि अतिमहत्वाकांक्षी असेल तर त्या महत्वाकांक्षेच्या पुढे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अगदी घरच्या माणसांचा सुद्धा तो विचार करीत नाही, आपल्या हेकेखोर, हट्टी स्वभावामुळे आपली जीवनतत्वे दुसऱ्यांच्यावर लादतो, पण अश्या माणसाच्या जीवनात शेवटी एकटेपण येते, आजूबाजूची माणसे दुखावतात शेवटी त्याला एकाकी जीवन कंठावे लागते, स्वभावामध्ये भावनेला महत्व देणे गरजेचे आहे. असा हा मध्यवर्ती धागा पकडून निर्माती जॉय भोसले यांनी त्यांच्या जॉय कलामंच या नाटयसंस्थेतर्फे " क्वीन मेकर " या नाटकाची निर्मिती केली आहे, नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून संगीत परीक्षित भातखंडे यांनी दिले आहे, वेशभूषेची जबाबदारी कहू नागेश भोसले हिने सांभाळलेली आहे. अक्षर कोठारी, शीतल क्षिरसागर, अंकिता पनवेलकर, इलिना शेंडे, अमित गुहे या कलाकारांनी भूमिका सादर केल्या आहेत.

क्वीन मेकर हि कथा मीर देशपांडे, नेहा देशपांडे यांची असून ती दोघे कॉर्पोरेट जगात उच्च स्थानावर असतात, मीर देशपांडे हा अत्यंत हुशार कर्तबगार असून कॉर्पोरेटच्या विश्वात त्याला खूप मान असतो, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर त्याचा प्रचंड आत्मविश्वास असतो, त्यामुळे स्वभाव अहंकारी आणि हट्टी बनलेला असल्याने दुसऱ्यावर हुकूमत गाजवायची हेच त्याला माहित असते, लहान मुले तर त्याला अजिबात आवडत नाहीत सदैव त्यांचा तिरस्कार करीत असतो, नेहा त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी सामान्य मध्यमवर्गीय हुशार मुलगी असते, एक दिवस मीर तिला मागणी घालतो आणि आपली राणी बनवून कॉर्पोरेट जगामध्ये " क्वीन " बनवतो, लग्नापूर्वी त्याने तिला आपल्याला मुलबाळ होऊ द्यायचे नाही हि अट घातलेली असते त्यावेळी नेहा ते मान्य करते पण पुढे तिला आई व्हावेसे वाटते, तिला दिवस जातात, मीर आकांत-तांडव करतो पण नेहाला मातृत्वाची ओढ लागलेली असते त्यामुळे मीर तिला आपल्या आयुष्यातून वेगळे व्हायला सांगतो,,, नेहा घर सोडून निघून जाते. हे सारे त्यांचा कॉमन मित्र राहुलच्या समोर घडते. मीर एकटा पडतो, त्याच्या ऑफिसमधील त्याची सेक्रेटरी मीनल हि एक गरीब घरातील मुलगी असते, तो तिला लग्नाविषयी विचारतो मोठी-मोठी स्वप्ने दाखवतो, पुढे त्यांचे लग्न होते, मीनलला सुद्धा मोठे व्हायचे असते घरातील पांच / सहा जणांची जबाबदारी असते, त्यामुळे ती लग्नाला होकार देते, मीर चा मित्र राहुल त्याची दोन लग्ने झालेली असतात, तो आता दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन पुन्हा पहिल्या बायकोशी संसार करणार असतो, तो आपल्या विश्वात सुखी असतो. कालांतराने नेहा ने एका लहान परी नावाच्या मुलीला दत्तक घेतलेले असते आणि ती परीला घेऊन मीर च्या घरी येते आणि आपल्या खोलीत मीर च्या परवानगीने राहायला लागते, परी हि मूक-बधिर मुलगी असली तरी ती हुशार असते, परिस्थितीची जाणीव तिला झालेली असते, मीर ला ती मुलगी आवडत नाही पण प्रत्येक ठिकाणी तिची लुडबुड असतेच.

एक दिवस मीर च्या आयुष्यात एक अशी घटना घडते कि त्यामुळे त्याचे जीवन डळमळीत होऊ लागते, त्याचे बालपण आठवते, त्या घटनेमुळे मीर ला त्या लहान परीचा सहभाग मान्य करावा लागतो, मीर ला तिच्याविषयी प्रेम आपुलकी वाटू लागते, ते प्रेम कश्यामुळे, कोणामुळे, कोणत्या कारणाने वाटते ?  परीची मदत का घ्यावीशी वाटते ? परी सुद्धा मीर ची काळजी घेत असते ? शेवटी नेमके काय घडते ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे ह्या नाटकात मिळतील, मीर ची भूमिका अक्षर कोठारी यांनी सहजतेने केली आहे, त्याचा हट्टीपणा, अरेरावीपणा, अहंकार इत्यादी भावना त्यांनी छान व्यक्त केल्या आहेत, नेहा ची भूमिका शीतल क्षीरसागर हिने अत्यंत संयमाने, विलक्षण ताकदीने रंगवली आहे, सुरवातीचे मीर बरोबरीचे वागणे आणि नंतर वेगळे झाल्यानंतर चे वागण्यातील फरक तिने छान पद्धतीने सादर केला आहे. मीनल ची भूमिका अंकिता पनवेलकर हिने मनलावून सादर केली असून स्वतःच्या सुखासाठी काय करावे लागते आणि शेवटी नशिबात काय येते ह्या भावना सुरेख दाखवल्या आहेत, राहुल ची भूमिका अमित गुहे यांनी सहजतेने सादर केली आहे, लहान परी हि एक मूक-बधिर मुलगी इलिना शेंडे हिने सुरेख आणि समजून सादर केली आहे, ती सुद्धा लक्षांत राहते, भावना हि सुप्रीम आहे, अंतिम सुख हे अर्थात मानसिक सुख हे आपल्याला भावनेमधूनच मिळते, माणसाने बुद्धी आणि भावनांचा समतोल राखणे गरजेचे आहे, माणसांनी, माणसाशी, माणसासारखं वागावं, अंतिम सुख हे भावनेमध्ये आहे, आपल्या यशापुढे आपल्या माणसांना विसरून जाऊ नये, यश मिळणे हि प्रगती जरी असली तरी तेथे भावनेला प्राधान्य देणे गरजेचं आहे असा संदेश हे नाटक कळत न कळत देऊन जाते.

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top