logo

भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ ह्या काळामध्ये आपले जीवन आखलेले आहे, आज आपण जगतोय तो वर्तमानकाळ - हा काळ सरून गेला आणि उद्याचा दिवस उगवला कि पुन्हा वर्तमानकाळ आणि मागे सरला तो भूतकाळ, असेच घडत असते, भविष्याची आपल्याला चिंता असते नक्की काय होणार हे माहित नसते त्यामुळे जीवन सुसह्य होत असते, पण समजा वर्तमानकाळातून आपण भूतकाळात ह्या क्षणी गेलो तर आपण जगलेला काळ हा भविष्यकाळ होईल आणि मग आपल्याला भविष्यात पुढे काय घडणार आहे ह्याची माहिती भूतकाळातील वर्तमानकाळात होईल म्हणजे " भूत-वर्तमान-भविष्याची " एक प्रकारची गुंतागुंत होऊन जाईल, - हि कल्पना भन्नाट आहे, काल्पनिक असली तरी त्यात गंमत आहे, हाच धागा " अमर फोटो स्टुडिओ " मध्ये मांडला आहे, सुबक आणि कलाकारखाना यांची हि संयुक्तपणे निर्मिती असून निर्माते सखी गोखले, सुव्रत जोशी, अमेय वाघ आणि सुनील बर्वे हे आहेत, सुनील बर्वे सादर करीत आहे सुबक निर्मित कला कारखाना प्रस्तुत " अमर फोटो स्टुडिओ " हे नाटक, लेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे आहे, दिगदर्शन निपुण धर्माधिकारी यांचे लाभले आहे, नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत गंधार, प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असून अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे सिद्धेश पुरकर या कलावंतांनी कामे केली आहेत,

अपु आणि तनु यांची हि कथा, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तरी सुद्धा अपु हा गळ्यात फास अडकवून आत्महत्येचा प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नात त्याला यश येत नाही, अपु चे वय सत्तावीस असून ह्याच वर्षी त्याचे वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा, काही ना काही निमित्ताने घर सोडून पळून गेलेले असतात, ती भीती त्याला सुद्धा वाटते आणि म्हणून तो आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे, त्याचवेळी तनु तेथे येते आणि अपु ला आत्महत्येपासून परावृत्त करते, अपु ला कामासाठी युरोपला जायचे आहे त्यासाठी त्याला व्हिसा साठी फोटो काढायचे असतात आणि ते फोटो काढण्यासाठी तनु त्याला स्टुडिओ मध्ये घेउन जाते आणि ते नेमके " अमर फोटो स्टुडिओ " मध्ये येतात, ह्या स्टुडिओचा मालक हा म्हातारा आणि काहीसा विचित्र स्वभावाचा असून तो आलेल्या माणसांना तत्वज्ञान ऐकवीत असतो तो म्हणतो " मी फोटो काढतो म्हणजे माझ्या समोर आलेला काळ मी कॅमेरात बंदिस्त करून ठेवतो आणि त्या काळाच्या फ्रेम्स करून भिंतीवर लावतो " मी काळ विकतो, आणि सांगतो कि तुम्ही “काळा” चेच उदाहरण घ्या, " भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ " हे आपापल्या जागी जरी असले तरी त्यावेळी जी व्यक्ती हे जीवन जगत असते त्या व्यक्तीला तो “ काळ “ “ नवीन “ असतो असे तत्वज्ञान सांगत म्हातारा त्याचे फोटो काढतो आणि " अपु " ला १९४२ च्या सालात एका चित्रपट स्टुडिओ मध्ये पाठवतो, आणि " तनु " १९७७ मध्ये एका हिप्पी च्या सहवासात जाते, आजच्या २०१७ मध्ये वावरणारा अपु हा जसाच्या तसा १९४२ मध्ये जातो तेथे त्याची काय अवस्था होते हे पाहण्यासारखे आहे, त्याच प्रमाणे त्याच्या बरोबरीची तनु हि १९७७ सालात तिला एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागते,,,,कथा सांगितली तर त्यातील मजा निघून जाईल तेंव्हा हे सारे अनुभवले तर अधिक मजा येईल,

"अमर फोटो स्टुडिओ " नाटक वेगळ्या धाटणीचे - स्वरूपाचे आहे, वेगवेगळ्या ट्रॅकवर हे नाटक चाललेले असले तरी शेवटी ते " समे " वर येते आणि एकसंघ होऊन जाते, नाटकाचे दिगदर्शन निपुण धर्माधिकारी यांनी अत्यंत चोखपणे केले असून सर्वच कलाकार नाटक उत्तम सादर करतात, सुव्रत जोशी [ अपु ] आणि सखी गोखले [ तनु ] अमेय वाघ याचा म्हातारा फोटोग्राफर, पूजा ठोंबरे हिने रंगवलेली १९४२ मधील नटी आणि सिद्धेश पुरकर याचा नट हा लक्षांत राहतो, सुव्रत जोशी यांनी रंगवलेला अपु आणि त्याचे वडील प्रकाश यांच्या आवाजातील आणि देहबोली मध्ये केलेला फरक मनाला भावतो,सखी गोखले हिने तनु च्या स्वभावातील विविध छटा उत्कटपणे सादर केल्या आहेत, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, शितल तळपदे यांची प्रकाशयोजना ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत, गंधार यांनी दिलेलं संगीत हे नाटकाला पूरक असेच आहे. एकंदरीत " अमर फोटो स्टुडिओ " हे लक्षांत राहणारी कलाकृती आहे

    Tags