logo

मुंबई, कीर्तन म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा. आपली संस्कृती जपत नवा विचार देणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने 'भक्तीचा प्रवाह' आयोजित केला आहे. महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शक्तीपीठ असलेल्या रेणूकामातेच्या माहुरगड येथील मंदिरात शुक्रवारी, ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत खानापूरकर यांचं कीर्तन अनुभवण्याची संधी मिळणार आहे. 'कुलस्वामिनी' या मालिकेतील कलाकार संग्राम साळवी, रश्मी अनपट या वेळी उपस्थित राहून रेणूकामातेचा आशीर्वाद घेणार आहेत.
 
स्टार प्रवाहनं आपल्या मालिकांद्वारे उत्तम आशय देताना, नवा विचार मांडतानाच मराठी संस्कृती जपण्याला प्राधान्य दिलं. रेणूकामातेची महती सांगणारी 'कुलस्वामिनी' ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहवर दाखल झाली. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित होते. या मालिकेच्या निमित्त स्टार प्रवाहनं अध्यात्म आणि नवा विचार पोहोचवण्यासाठी कीर्तन या पारंपरिक माध्यमाची निवड केली आहे. कीर्तनाची परंपरा पुढे नेण्यासाठी 'भक्तीचा प्रवाह' ही संकल्पना प्रत्यक्षात आली. 'कृती होईल तर देव देईल' हा विचार कीर्तनातून पोहोचवण्यात येत आहे. या संकल्पनेतील कीर्तनाचा पहिला कार्यक्रम सांगली इथं झाला. सांगलीकरांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांनी कीर्तन अनुभवलं.
 
आस्तिक-नास्तिकतेचा संघर्ष हे 'कुलस्वामिनी' या मालिकेचं कथासूत्र आहे. शुक्रवार हा देवीचा वार, शक्तीपीठ असं औचित्य साधून  माहुरगडावर पारंपरिक कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे. या वेळी मालिकेतील संग्राम साळवी आणि रश्मी अनपट हे कलाकार उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी, ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या प्रशांत खानापूरकर यांच्या या कीर्तनाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्टार प्रवारतर्फे करण्यात आलं आहे.

    Tags