Breaking news

शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - पंकजा मुंडे

मुंबई(प्रतिनिधी)वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असून ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महिलांविषयक योजनांनाही अर्थसंकल्पात महत्वाचे स्थान देण्यात आले असून हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगिण विकासाला अधिक गतिमान करेल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण जनतेच्या जीवनातील दळणवळण सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४ हजार ७०० कि.मी. रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी या अर्थसंक‍ल्पात १ हजार ६३० कोटी रुपये निधी राखून ठेवला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. राज्यातील गावांच्या शाश्वत विकासास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने स्मार्ट ग्राम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला प्राधान्य देण्यासाठी १० ते ४० लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. त्याकरीता ५३ कोटी ८० लाख रुपये इतका निधी प्रस्तावित केला आहे. छोट्या गावांना पायाभूत सुविधांकरिता भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या सन्मान व समानतेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून महिलांचे प्रश्न व अन्य तक्रारींचे निवारण व्हावे, त्यामध्ये जाणीव जागृती व्हावी व महिला आयोगास सक्षमतेने काम करता यावे यासाठी मागील तीन वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ करुन ७ कोटी ९४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. अंगणवाडी बालकांना पोषण आहार देण्यासाठी ३१० कोटी ५७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांच्या दारिद्र्य निर्मुलनासाठी, त्यांच्या विविध संस्थांच्या बळकटीकरणासाठी ५५ हजार ११८ महिला स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्याचे नियोजन असून त्यामध्ये ५ लाख ६२ हजार ८५ कुटुंबाचा समावेश करण्यात येईल. या वित्तिय अर्थसंकल्पात विविध योजनांकरिता १३३.८४ कोटी एवढा निधी प्रस्तावित केला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता योजना सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकुणच हा अर्थसंकल्प शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासास चालना देणारा आणि महिलांच्या सक्षमीकरणास प्रोत्साहन देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Related Photos