Breaking news

जागतिक महिला दिनी महिला पोलिसांनी सांभाळला हिमायतनगर ठाण्याचा कारभार

हिमायतनगर(अनिल मादसवार)दि.०८ मार्च जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान केला जातो. आणि यशस्वी महिलांचा आदर्श समजापुढे ठेवण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी जागतिक महिला दिनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्यांवर पोलिस ठाण्याच्या कारभाराची जबाबदारी सोपविली होती. दिवसभर उत्तम प्रकारे या महिला कर्मचार्यांनी यशस्वीरित्या काम सांभाळत हम भी कुछ कम नही... हे सिद्ध करून दाखविले.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसल्याचे समाजातील अनेक कर्तुत्ववान महिलांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना हिमायतनगर पोलिस ठाण्यात ४ ते ५ महिला पोलीस कार्यरत आहेत. आज ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलिस कर्मचारी अनुराधा भंगे यांनी यशस्वी कारभार चालविला तर अश्विनी श्रीमंगले हिने खबरी अहवाल ऑनलाईन करण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली. तर मोहरीला व आरटीपीसी म्हणून शकील पठाण यांनी काम पहिले. तसेच अन्य महिला कर्मचार्यांनी आपली कर्तव्ये यशस्वी पद्धतीने सांभाळली. यावरून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणाऱ्या समाजातील महाभागांना पोलीस दलात निर्भीडपणे काम करणाऱ्या डेंशींग महिला कर्मचार्यांच्या कर्तुत्वाने एक प्रकारे पुरुषपेक्षा महिलाही कमी नाहीत याची जाणीव करून दिली आहे. यावेळी नेमणुकीवर असलेल्या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड, एएसआय डांगरे, घुन्नर, संदीप आणेबोईंवाड, शंकर मुकाडे, शेख मसूद आदींसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Photos