Breaking news

हिमायतनगरातील सैराट माकडांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी...

हिमायतनगर(अनिल मादसवार)गेल्या काही महिन्यापासून हिमायतनगर शहरात धुमाकूळ घातलेल्या लाल तोंडी माकडांना पकडण्यात वनविभाग अपयशही ठरले आहे. वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे जवळपास १५ ते २० जणांना माकडांच्या हैदोसाचा सामना करावा लागला आहे. तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून केला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हिमायतनगर तालुक्यातील, मौजे सरसम, मंगरूळसह अन्य गावात धुमाकूळ माजवून हैराण केलेल्या माकडांनी गेल्या काही महिन्यापासून हिमायतनगर शहरात बस्तान मांडले आहे. या उपद्रवी माकडांनी हिमायतनगर गावातील नागरिकांना, महिला व लहान मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला माकडांची सर्वना मौज वाटली त्यामुळे गावातील नागरिकांनी माकडांच्या उपद्रवाला गंभीरतेने घेतले नव्हते. परंतु दिवसेंदिवस माकडचाळे वाढत जाऊन याचा त्रास महिला, मुलींना व बालकांना होऊ लागला आहे. या माकडांनी बालाजी गायकवाड, आपराव किर्रकन, बाबुराव वाड्यावरचे, मारोती बक्केवाड, कोंडबाराव शिंदे, एकनाथ कदम, मारोती वाघमारे यांच्यासह अनेकांना पाठलाग करून जखमी केले होते. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली होती. परंतु अद्याप बंदोबस्त झाला नसल्याने आज दि.११ रोजी सकाळी ६ वाजता या उपद्रवी माकडांनी शहरात धुमाकूळ घातला, यावेळी नागरिकांना तावडीतून वाचविण्यासाठी गेलेले बाबुराव होनमने हे थेट छतावरून पडून जखमी झाले आहेत. यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांच्या हाताला - पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या ठिकाणी कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी हे शहराच्या ठिकाणी राहून आठवड्याला एकदा ये - जा करत असल्याने तालुक्यातील नागरिकांना माकडाच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षित कारभाराने माळरानावरील गौण खनिज, वृक्ष तोड वाढली आहे. याबाबत कोणतेही ठोस पाऊले उचलली जात नसल्यामुळे नागरीकातून वनविभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिला व चिमुकल्यांना इजा पोचविणाऱ्या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या बाबीला गंभीरतेने घेत माकडास पकडण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन हेल्पिंग हैंड्स वाईल्ड लाईफ वेल्फेयर सोसायटीच्या टीमला पाचारण करून या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा माकडाच्या उपद्रवाने होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही वनविभाग घेईल काय...? असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीसमोर व्यक्त केला आहे.

Related Photos