Breaking news

जंगलतोड रोखण्यासाठी पोटा बु.येथे लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

हिमायतनगर (अनिल मादसवार) लाभार्थ्यांनी मिळालेल्या गॅसचा जपून वापर करावा व गावालगत असलेल्या जंगलातील वृक्षाचे जतन करुण पर्यावरण सांभाळावे असे आवाहन माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे येथे वनविभागाच्या वतीने जल, जमीन, आणि जंगलाचे संगोपन होण्यासाठी अनुदानावर देण्यात येणाऱ्या गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी जी.प.सदस्य सुभाषदादा राठोड, बाबुराव कदम विरसनीकर, एन.डी.कदम, कैलास माने, सरपंच मारोती कोठुळे, शिवाजी माने आदींची उपस्थिती होती. वन विभागात वृक्षतोड कमी व्हावी, जंगलावरील सरपणाचा भार कमी व्हावा, या उद्देशाने वन विभागामार्फत २०१२-१३ या वर्षापासून जंगलालगतच्या गावातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानावर नवीन गॅस कनेक्शन देण्याची योजना राबविली जात आहे. याशिवाय वन विभागाकडून गॅस कनेक्शन मिळालेल्या लाभार्थ्यांना तीन वर्षापर्यंत मोफत २६ गॅस सिलिंडर पुरविण्याची जबाबदारी वन विभाग घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जंगलाच्या काठावर असलेल्या गावातील अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना हिमायतनगर तालुक्यातही मौजे पोटा बु.येथे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वनसमितीचे अध्यक्ष खंडू कोठुळे, पत्रकार परमेश्वर गोपतवाड, गंगाधर वाघमारे, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे, अनिल मादसवार, वसंत राठोड आदींसह गावकरी नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वन संरक्षण संवर्धनासोबतच योजनांच्या अंमलबजावणीसाठी समितीचे अध्यक्ष खंडू कोठुळे, व सर्व सदस्य सहकार्य करत आहेत. वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गॅस कनेक्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. या रकमेतून समितीचे सदस्य गॅस कनेक्शन वितरणासाठी वन कर्मचाऱ्यांना सहकार्य करतात. एकूणच वन विभागाच्या या योजनेमुळे जंगलावरील भार कमी होण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती सरपंच मारोती कोठुळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

Related Photos