Breaking news

अनेक बंधारे नादुरुस्त असतांना नविन बंधाऱ्यावर लाखोची उधळपट्टी

हिमायतनगर(प्रतिनिधि)तालुक्यातील अनेक ठिकाणी बंधाऱ्यांच्या बांधकामसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. वास्तविक पाहता यापुर्वी बांधण्यात आलेले अनेक बंधारे अर्धवट तर काही नादुरुस्त आवस्थेत असताना नविन बंधाऱ्याचा घाट कशाला..? असा सवाल विकासप्रेमी जनतेतून उपस्थित केला जात आहे.

हिमायतनगर तालुक्यात सरसम, खडकी, टेंभी, वडगांव, आंदेगाव, पवना, वारंगटाकळी, दरेसरसम, पोटा, वाळकेवाडी, सोनारी, पारवा, मोरगाव, खैरगाव, किरमगाव, घारापुर, वटफळी आदी ठिकाणी यापुर्वी कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले. परंतु या बंधाऱ्याचे कामे निकृष्ट व अर्धवट अवस्थेत केल्या गेल्याने बंधाऱ्यात पाणी साचून न राहत पुढे वाहून गेले आहे. परिणामी आजघडीला या बांधार्याच्या ना शेतकऱ्यांचा फायदा झाला ना नागरिकांना. यातील अनेक बंधारे हे गेट बसविल्या गेले नसल्याने अर्धवट अवस्थेत आहेत. तर कित्येक बंधाऱ्याच्या कामात मोठं मोठे टोळके दगड भरून बांधण्यात आल्याने ते बंधारे मोडकळीस येऊ लागले आहेत. त्यामुळे शासनाच्या जलसंधारण व सिंचनाचा प्रश्न अधांतरी लटकल्याचे दिसून येत आहे. याच बंधाऱ्याची दुरुस्ती केल्यास तालुक्यातील पाण्याचा व सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल. परंतु याकडे प्रशासन लक्ष न देता लाखो - कोट्यवधी रुपयांच्या नवीन बंधाऱ्यानां मंजूरी देत असून, केवळ अधिकारी, राजकीय नेते व गुत्तेदारांच्या भल्यासाठीच या बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे काय ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. सद्यस्थितीत चालू असलेल्या मौजे सरसम व वडगांव, कोत्तलवाडी सह तालुक्यात चालू असलेल्या बंधाऱ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूणच तालुक्यात सुरू असलेल्या बंधार्यासह अनेक रस्ते, इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून संबंधित अभियंते, गुत्तेदार व राजकीय नेते मालामाल होण्यासाठी हा सर खटाटोप केला जात असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे.

याची ओरड होत असल्याने पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती सौ.माया राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली असता अनियमितता असल्याचे दिसुन आल्याचे त्यांनी सांगितले. या बंधाऱ्याची कामे कोणत्या खात्याकडून करण्यात येत आहे, एजन्सीचे नाव, निधी, अभियंता याबाबतची कोणतीही माहिती येथे लावण्यात आलेली नसल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Photos