Breaking news

राष्ट्रीय मार्ग, प्रमुख रस्त्यावरील दारूची दुकाने ३१ मार्चनंतर होणार बंद

हिमायतनगर(कानबा पोपलवार)अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता राष्ट्रीय मार्ग, राज्यरस्त्यासह प्रमुख रस्त्यावरील दारूची दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मद्य विक्रेत्यांची भंभेरी उडाली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील १३ दारूचं दुकानांचा यात समावेश असून, काही दारूची दुकाने नांदेड - किनवट या प्रमुख पालखी मार्गावर आहेत. तर काही दुकाने धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहेत. या दुकानांमुळे वाहनचालकांना रस्त्यातच वाटेल तेथे व येथेच्छ दारू मिळत असल्याने दारू पिऊन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अपघाताची संख्याही वाढली असून, यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने याची गांभीर्याने दाखल घेत मा.सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी मुख्य रस्त्यावरील दारूची दुकाने ५०० मीटर अंतराच्या बाहेर हलविण्याचा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दारूबंदी विभागाने १० मार्च रोजी याविषयीच्या सूचना संबंधित दुकानदारांना दिल्या आहेत. यात हिमायतनगर तालुक्यातील कमलाबाई एन.जयस्वाल, लिंगारेड्डी तिप्पनवार, चंद्रकांत चिंचाळकर, लक्ष्मीबाई लुटे व भागीदार, हॉटेल श्रीचक्रा करंजी, नक्षत्र फैमिली गार्डन, विसावा रेस्टोरंट, हॉटेल स्वप्नील मौजे घारापुर, हॉटेल प्रिन्स हिमायतनगर, हॉटेल संदीप बार एन्ड रेस्टोरंट हिमायतनगर, परसराम कंकटवार, परमेश्वर माधवराव आलेवाड पोटा बु., देवय्या बंडीवार याना दिल्या आहेत.

या विषयी किनवट उपविभागातील उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन घेण्यास नकार दिला. तर हिमायतनगर भागाचे बिट जमादार जाधव यांनी एस.पी.ऑफिसवरून माहिती घेण्याचा सल्ला देऊन हात वर केले आहे.

Related Photos