logo

नांदेड, शहरी भागात वाढते सिमेंटिकरण व भ्रमणध्वनीच्या लहरींमुळे पक्षाचा चिवचिवाट... चिऊ-काऊची ओळख पुस्तकातील चित्रावरून करण्याची वेळ आली आहे. असे असताना ग्रामीण भागात आजही पशु पक्षांना चारा - पाणी टाकण्याचा छंद जेष्ठ पक्षी प्रेमींकडून जोपासला जाऊन मानवतेचा धर्म पाळला जात आहे. 
 
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील पक्षीप्रेमी रामा गायकवाड याना बालपणापासून पशु, पक्षी, पाळीव प्राण्यांचा लळा लागला आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी सुद्धा चिऊताईना वाचविण्याचा छंद नित्यनेमाने जोपासत आहेत. यंदाच्या खरीप हंगामाचा पाऊस लांबणीवर गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता तर वाढलीच चिमण्यासह पक्षांना अन्न व पाण्यासाठी भटकावे लागते आहे. अश्या स्थितीत पशु पक्षांचे हाल होऊ नये म्हणून दररोज सकाळी पळसपूर येथील नागनाथाच्या मंदिर परिसरात असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून अनेकांकडून मागून आणलेले दाणे व झाडांना बांधलेल्या मडक्यात पाणी टाकून पक्षांची तहान भागवीतात. सकाळच्या प्रहरी स्वच्छ मनाने पुंगी वाजवून पक्षांना बोलावून तांदळासह अन्य प्रकारचे दाणे टाकतात. त्यांच्या पुंगीतून निघणाऱ्या दत्त.. दत्त... स्वरांचा आवाजाणे झाडावर, तारांवर बसलेल्या चिमण्या येऊन चोचीत बसेल तितके दाणे काही क्षणातच फस्त करतात. गायकवाड बापूचे वय अंदाजित ८५ च्या आसपास आहे. दिसत नसला तरी दर काही दिवसांनी लागणारा दमा, चार पाऊले चालल्यानंतर लागणारी धाप, आतडं पिळवटून टाकणारा खोकला तरीदेखील पक्षांना पाणी आणि दाणे टाकण्याचा छंद सकाळी उठून नित्यनेमाने जोपासत आहेत. त्यांना पोपट, कबुतरे पाळणे, वानरे यासह विविध पशुपक्षांचा छंद असल्याने या भागातील नागरिक त्यांना पक्षीप्रेमी नावाने ओळखतात. त्यांच्या कार्यामुळे सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव आणि पक्ष्यांच्या थव्यांचा किलबिलाट मागील अनेक वर्षांपासून गावकरी अनुभवताहेत. 

सिमेंटच्या जंगल व मोबाईल टॉवरमुळे दिसणारे पक्षी दुर्मिळ  

गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातील मोठी वृक्ष विकासाच्या नावाखाली तोडली जात आहे. जिकडे तिकडे सिमेंटची घरे जंगलातील झाडासारखे वाढले आहेत. त्यामुळे रस्त्यावर सावली तर सोडाच झाडे कमी झाली असून, केवळ घराच्या आवारात फुलाची झाडे, लहान वृक्ष तेवढीच जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाण्यासाठीही अन्न मिळत नाही. शेतात उत्पादित होणाऱ्या पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांची फवारणी केली जात असल्याने, झाडाझुडुपांवर आढळणारे कीटकही आता पक्ष्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे पक्षांचे हे खाद्यही विषयुक्त बनले असून, मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे गावात दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. कधीकाळी झाडांवर घरटी करून राहणाऱ्या पक्ष्यांचा निवारा, चिमण्यांचा चिवचिवाट हिरवण्यास आपण मनुष्यच कारणीभूत ठरत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
सर्वानी प्राणिमात्रांवर दया दाखवावी - गायकवाड 
पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे पळसपूर गावातील रामा दाऊ गायकवाड हे दुसऱ्या पिढीतले पक्षी प्रेमी आहेत. त्यांच्या वडिलांपासून पशु पक्षांना चारा - पाणी टाकण्याचा छंद जोपासला जातोय. अश्या दुष्काळी परिस्थितीत सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, मंडळांनी पशु - पक्षासाठी चारा - पाणी टाकावे, झाडांवर, घरावर, जंगलात पाण्याची भांडी भरून ठेऊन प्राणिमात्रांवर दया दाखवावी आणि मानवता धर्म पाळावा. ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी धान्य आमच्यापर्यंत पोचवावे असे आवाहनही ते करत आहेत.
 

    Tags