logo

हिमायतनगर, तेलंगणा - मराठवाड्याच्या सीमेवरी मौजे वाळकेवाडी येथील जि. प. शाळेला शिक्षकाच्या रिक्त जागांसाठी संतप्त झालेल्या पालकांनी दि. १० रोजी शाळेला कुलुप ठोकून प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध केला. कुलूप ठोकल्याचे माहित होऊनही गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चक्क दुसऱ्या दिवशी भेट देऊन तात्पुरते तीन शिक्षक दिल्याने कुलूप काढले असले तरी,  तातडीने कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पुन्हा कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा दिला आहे.   

डोंगराच्या पायथ्याशी बसलेले वाळकेवाडी गाव शंभर टक्के आदिवासी बहुल असून येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ची शाळा आहे. एकूण ३९८ च्या आसपास विद्यार्थी असतं देखील केवळ ५ शिक्षकावर कारभार चालविला जात आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असून, काही शिक्षकांनी मनमानी कारभार चालवून दिर्घ रजा घेतली आहे. परिणामी एका वर्गात दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसवून ज्ञानदानाचे कार्य केले जात असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गेल्या काही वर्षांपासून या भागाचे लोकप्रतिनिधी व गटशिक्षण अधिकारी हे जोपर्यंत शाळेला कुलूप लावले जात नाही तोपर्यंत इकडे ढुंकूनही पाहत नाहीत असा आरोप रामदास वाळके यांनी केला आहे.  

खा.राजीव सातव यांनी शाळेची पाहणी करून देखील गटशिक्षण अधिकारी याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत आहेत, एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार यांच्या गटातील शाळेतील  शिक्षणाची दुरावस्था झाल्याने शिक्षणाचे वाटोळे होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दि.१० सोमवारी सकाळी १० वाजता शाळेला कुलुप लावले होते. याची माहिती मिळतच गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दाखल घेणे गरजेचे होते, मात्र एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेला भेट देऊन तेही तात्पुरते शिक्षक दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता कुलूप काढण्यात आले असले तर लवकरात लवकर शाळेला नवीन इमारती, कायमस्वरूपी शिक्षक द्यावे अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मग अवलंबवावा लागेल असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे रामदास वाळके यांनी दिला. याप्रसंगी  सरपंच सौ. अनुसयाबाई डवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा डवरे, किशोर धुमाळे, पदमाकर सरकुंडे, संतोष देशमुखे, दीपक वाळके, शेख महेबुब, चिमनाजी बनसोडे, फेरोज पठाण,  देविदास डवरे, तानाजी वाळके, यांच्यासह गावातील नागरिक, पालक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    Tags