logo

हिमायतनगर, तालुक्यातील ग्रामीणभागात शेतकरी रखरखत्या उन्हात नांगरणी करत आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने काही शेतकरी ट्रॅक्टर ऐवजी बैलजोडीनेही नांगरणी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. तर खरिपाच्या नियोजनासाठी कृषी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीवरून चिडून येत आहे. 

बदलत्या परिस्थितीनुसार शेतकर्‍यांनी आता अत्याधुनिक शेती पद्धतीला सुरूवात केली. मात्र दुष्काळी परिस्थितीत आणि त्यातच उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ट्रॅक्टरव्दारे शेती मशागत करण्यासाठी एकरी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहे. परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी चार्‍या-पाण्याअभावी बैलजोड्या विक्रीस काढल्या आहेत. परिणामी मशागतीची कामे करणे अवघड होऊन बसले आहे. मागील खरिपाबरोबर रबीतूनही शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतात शेतकरी मेहनत करत आहेत. परंतु यासाठी लागणारा पैसा आणायचा कोढून याची चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. नुसती नागरणी करायची म्हटले तर एकरी हजार ते पंधराशे रुपये, त्याशिवाय पेरणी, वखरणी व इतर मशागतीसाठी खर्च वेगळा लागणार असून, पेरणी कशी करायची याची चिंता पडली आहे. ट्रॅक्टरचे सुटे भाग, डिझेलचे वाढते भाव याचा परिणाम म्हणून ट्रॅक्टर नांगरणीचे भावदेखील वाढवले गेले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी ५०० रुपये नांगरणी केली जात होती. आता मात्र एका एकरासाठी हजार रुपये मोजावे लागतात. एक एकरासाठी हजार कमी दिसत असले तरी इतर खर्च हिशोबात धरल्यास अल्पभूधारक मेटाकुटीस आला आहे. दैनंदिन शेतमजुरी पद्धत संपुष्टात आली असून, शेतीची अंग मेहनतीची सर्व कामे कंत्राटी पद्धतीनेच करीत आहेत. तेव्हा दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना परवडणारे नाही, अशी तालुक्यातील गावागावांतील शेतकर्‍यांची परिस्थिती झाली असून, अद्याप कर्ज पुनर्गठणाचा प्रश्नही रेंगाळत असल्याचे दिसत आहे. आकाशात ढग केव्हा येतात व पाऊस केव्हा होतो याची शेतकरी वर्ग चातकासारखी प्रतीक्षा करतो अश्या प्रतिक्रिया तळपत्या उन्हात शेती मशागतीच्या व्यस्त बळीराजाने दिल्या. 

खरीप नियोजनाबाबत बैठक संपन्न
येथील पंचायत समिती मध्ये असलेल्या कै. वसन्तराव नाईक सभागृहात नुकतीच खरीप हंगामापूर्व  नियोजन बैठक सभापती सौ.मायाताई राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपसभापती खोब्राजी वाळके, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विलास गंगावणे, कृषी विस्तार अधिकारी पंडित मोरे व शहरातील परवानाधारक कृषी दुकानदार मोठ्या सांख्येने उपस्थित होते. 

तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ४७४.८ एवढे असून, पेरणीयोग्य क्षेत्र ३९ हजार ९२४.२० हेक्टर एवढे आहे, त्यापैकी खरीप खालील लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ७९० एवढे आहे. यासाठी लागणारे बी- बियाणे या बाबतचा संक्षिप्त आढावा यावेळी घेण्यात आला. सॅन २०१७ मध्ये लागवड होणारे पेरणीयोग्य क्षेत्राचा व बियाणांचा आढावा घेण्यात आला. भात ३३ हेक्टरवर पेरणीसाठी १४.८५ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. ज्वारी ०१ हजार ६५४ हेक्टरवर पेरणीसाठी १२४.०५ क्विंटल बियाणे, तूर ०३ हजार २२५ हेक्टरवर पेरणीसाठी ४८३.७५ क्विंटल बियाणे, मूग - ४९२ हेक्टरवर पेरणीसाठी ७३.८० क्विंटल बियाणे, उडीद ५१२ हेक्टावर पेरणीसाठी ७६.८० क्विंटल बियाणे, तीळ २२ हेक्टरवर पेरणीसाठी ०१.६५ क्विंटल बियाणे, सोयाबीन १२ हजार २२५ हेक्टरवर पेरणीसाठी ८ हजार ५५७ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. उसाची लागवड ०१ हजार ४५० हेक्टरवर झाली असून तर कापूस १७ हजार २३३ हेक्टरवर लागवडीसाठी ८६ हजार १६५ बियाणे पॉकेट आवश्यक आहेत. एकूण यंदाच्या खरीप हंगामात ३६ हजार ८४६ हेक्टवर पेरणी योग्य क्षेत्र अपेक्षित असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. यासाठी लागणारी ११ हजार ११६ मेट्रिक टन रासायनिक खताची आवष्यकता असून, यात युरिया - ०३ हजार ७१५ मेट्रिक टन, डी.ए.पी. - ०२ हजार ७९५ मेट्रिक टन, एम.ओ.पी. - ९८९ मेट्रिक टन, एन.पी.के - ०२ हजार २२८ मेट्रिक टन, एस.एस.पी.- ०१ हजार २३८ मेट्रिक टन, अमोनियम सल्फेट - १०८ मेट्रिक टन, कैल्शियम नायट्रेट ४३ मेट्रिक टन आणि सल्फेट ऑफ पोटैश - ४३ मेट्रिक टनची मागणी प्रस्तावित करण्यात आली असल्याचे कृषी विस्तार अधिकारी पुंडलिक माने यांनी दिली. 

कृषी संचालकांना इ - पॉस मशीनचे प्रशिक्षण 
यावेळी बैठकीस उपस्थित शहरातील परवानाधारक कृषी संचालकांना कृषी विभागाच्या वतीने रासायनिक खताचे थेट लाभ हस्तांतर करण्यासाठी इ - पॉस मशीनचे प्रशिक्षणाचे प्रशिक्षण चंबळ फर्टिलायझर द्वारा देण्यात आहे. यावेळी कृषी अधिकारी पंडित मोरे यांनी मशीनचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. आगामी ०१ जून पासून ऑनलाईन पद्धतीने खताची विक्री होणार असून, इ - पॉस मशीन द्वारे विक्री झालेल्या खात ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट असल्याचे खात्री करून घेऊन खताची मागणी करावी. खरीप हंगामातील रासायनिक खताची खरेदी - विक्रीसाठी १५ मे पासून तालुक्यात एकूण ३३ ठिकाणी इ - पॉस मशीन उपलब्ध होणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना खताचे वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.आर. माने यांनी केले तर बैठकीचे नियोजन कृषी विभागातील एम.टी.सुडे, जी.एस. जाधव, अद्वैत देशपांडे आदींची उपस्थिती होती. 

    Tags