logo

हिमायतनगर, गेल्या काही महिन्यापासून शहरात चोरटे सक्रिय झाले असून, बुधवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांसह पाकिटमाराचा पुन्हा सुळसुळाट सुरु झाला आहे. तसेच दारू बंदीतही दारूची विक्री व जुगार अड्डे बिनबोभाटपणे चालविले जात असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. या प्रकाराकडे पोलीस अधीक्षक मीना यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील वर्षांपासून हिमायतनगरच्या आठवडी बाजारात होणाऱ्या चोरयाची संख्या कमी झाली होती. ती पुन्हा फेब्रुवारी महिन्यायापासून पूर्ववत सुरु झाली आहे, आठवडी बाजारच्या दिवशी बाजारात भाजीपाला खरेदी करणार्यांना चोरट्यांनी हैराण करणे सुरु केले आहे. या प्रकारामुळे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्यांच्या खिश्यावर चोरटे हात साफ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच प्रकार २२ फेब्रुवारी शहरातील काही नागरिकांसोबत घडला असून, नगदि रक्कम असलेले पाकीट मारल्या गेल्याने पैश्यासह महत्वाची कागदपत्रेही चोरीला गेली अशी तक्रार शहरातील रुख्मिणी नगर भागात राहणारे उत्तमराव शिक्षक जाधव यांनी पोलिसात दिली. त्यानंतर गेल्या आठ दिवसापूर्वी हिमायतनगर शहरातील रुख्मिणी नगर भागात एकच रात्रीला ६ ठिकाणी घरफोड्या झाल्या. या सर्व घटनेचा तपास अजूनही गुलदस्त्यात असताना चोरीच्या घटना घडू नये म्ह्णून पोलिसांनी बंदोबस्त लावणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने शनिवार दि.१३ च्या रात्रीला महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या महावितरण, डाक कार्यालयात सेवा बजावणाऱ्या भाडेकरूंच्या घरातील सर्वच युवकांच्या खिशातील रक्कमेवर चोरटयांनी डल्ला मारला याची तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीच नोंद केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटना वाढत असताना पोलीस अक्षमय दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे. 

याची चर्चा शहरात होत असताना दि.१७ बुधवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करताना दैनिक लोकपत्रचे पत्रकार दिलीप शिंदे यांचा खिशातील सैमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्यानी लंपास केला. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसात देण्यासाठी गेले असता पोलीस चोरीची तक्रारी ऐवजी हरवल्याची तक्रार देण्याचा सल्ला देऊन आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुभव शिंदे याना आला आहे. एकूणच पोलिसांची निष्क्रियता व कामचुकार पणामुळे बाजारच्या दिवशी अनेकांचे मोबाईल व पाकीट चोरीला गेल्याने पुन्हा पाकीटमार, चोरटे सक्रिय झाल्याच्या प्रकाराला दुजोरा मिळत आहे. एवढेच नव्हे तर शहरात टवाळखोर्या करणाऱ्यासह, पाकीटमार व वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील वयोवृद्ध नागरिकांना रहदारी, महिला - मुलींना टवाळखोऱ्यांचा व पादचाऱ्यांना अवैद्य वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीला शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त, आठवडी बाजाराच्या दिवशी सिव्हिल ड्रेसमध्ये बाजारात, मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी नेमण्यात आलेले पोलिस कर्मचारी बाजारात, गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्याचे सोडून आपल्या घरघुती कामात जास्त लक्ष देत आहेत. येथील ठाण्यात कार्यरत अनेक पोलीस कर्मचारी हे नांदेडला राहून अपडाऊन करत असल्याने हिमायतनगर शहर व तालुक्याची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे.  

शहरासह ग्रामीण भागात घडणाऱ्या तक्रारी पोलीस स्थानकात आल्यानंतर त्याचे निराकरण करून सस्य सोडविण्याऐवजी तक्रारींच्या तडजोडीसाठी राजकीय दलाल व संबंधित पोलीस पाटलांशी मिलीभगत केली जात असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. परिणामी ग्रामीण व शहरी भागात बिनबोभाटपने दारू बंदीतही राजरोसपणे दारू, जुगार अड्डे व रेतीचा गोरखधंदा सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खर्यांना न्याय मिळणे अवघड बनले असून, हिमायतनगर शहरात घडणाऱ्या या प्रकाराकडे नूतन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी लक्ष देऊन शहरात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्री, जुगार अड्ड्यासह सर्व अवैद्य धंदे बंद करावे. आणि शहरवासीयांना सुरक्षा द्यावी अशी रास्त मागणी केली जात असून, त्यासंदर्भात एक शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे समजते.

    Tags