Breaking news

मुलांचा माणूस लॉर्ड बेडन पॉवेल

22 फेब्रुवारी 2016 स्काऊट गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांची 159 वी आणि लेडी ऑलेव्ह बेडन पॉवेल यांची 127 वी जयंती यांच्या पावन स्मृतीस नांदेड स्काऊटस्‌ आणि गाईडस्‌ परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम ! संपूर्ण जगात हा दिवस स्काऊट गाईड चिंतन दिन म्हणून साजरा करतात. त्यानिमित्य स्काऊट गाईड चळवळीचा प्रचारा व प्रसाराकरीता थोडक्यात माहिती देत आहोत. - संपादक

शैक्षणिक आणि सामाजिक सेवा असा दुहेरी संगम असलेली पवित्र स्काऊट गाईड चळवळीचे संपूर्ण आकलन करावयाचे असेल तर चळवळीच्या जनक यांची माहिती असणे आवश्यक आहे. मुलांविषयी ज्यांना जास्तीत जास्त आस्था व आवड होती अशी जगात जी मोजकी माणसे होऊन गेली. त्यापैकी स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल हे एक फार थोर मुलांचा माणूस म्हणून होऊन गेले. सर्व स्काऊट गाईड त्यांना बी. पी. या आवडत्या नावाने ओळखतात.

रॉबर्ट स्टीफन्सन स्माइथ बेडन पॉवेल हे त्यांचे संपूर्ण नाव त्यांचा जन्म इंग्लडमध्ये लंडन येथे 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. गाईड चळवळीच्या जनक लेडी ओलेव्ह बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रु. 1889 मध्ये झाला. कु.अँजनीज बेडन पॉवेल या गाईड चळवळीच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या. त्यांचे वडील रेव्हरंड (धर्मगुरु) एच.जी बेडन पॉवेल हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. तर आई ब्रिटीश डमिरल (दर्यासारंग) डब्लू टी.स्माइथ यांची कन्या होती. पणजोबा जोसेफ ब्रअर स्माइथ हे अमेरिकेत न्यू जर्सी येथे वसाहतवाले म्हणून गेले होते. इंग्लडंच्या निरनिराळया भागात आपल्या आई व चार भावंडासह भ्रमंती करून रॉबर्टने बालपणीच मोकळ्या हवेतील निसर्गनिवास व उघडया वातावरणातील दिव्य जीवनाचा लाभदायक आनंद मिळवला होता.

लंडनमधील चार्टर हाऊस स्कूल या शाळेत शिष्यवृत्तीव्दारे 1870 मध्ये बी.पी.नी प्रवेश केला. ते काही विशेष लक्ष वेधून घेतील असे हुशार नव्हते परंतु अतिशय तरतरीत आणि उत्साही विद्यार्थी होते. शाळेत चार भिंतीबाहेर घडणार्‍या गोष्टीत मात्र ते अगदी मनापासून उत्साहाने भाग घेत. फुटबॉल संघाचे उत्तम गोलकीपर म्हणून त्यांची ख्याती होती. अभिनय कौशल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांचे ते आवडते होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चार्टर हाऊस शाळेतील अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर बी.पी.ना लगेच भारतात सब लेफ्टनंट पदावर नोकरीवर जाण्याची संधी स्विकारली.त्यांनी सैनिक सेवा उत्तम तर्‍हेने बजावली. त्यामुळे 26 व्या वर्षी कॅप्टन पदावर पोहचले. सन 1887 मध्ये अफ्रिकेतील झूलू व अशांती लोकांशी रानटी,हिंसक माताबेली योध्यांच्या चकमकीत भाग घेतला.अफ्रिकेतील आदिवासी त्यांना इतके भीत की,त्यांचे इम्पीसा हे नाव ठेवले.सदैव जागरूक असणारा लांडगा म्हणत बी.पी.नी 217 दिवस शत्रुशी मुकाबला करून मेफकिंगची लढाई जिंकली.यानंतर त्यांना मेजर जनरल हा वरच्या दर्जाचा हुदा मिळाला. जनतेच्या दृष्टीने ते एक मोठे वीर पुरूष ठरले.लष्करातील लोकांकरिता एड्‌स टू स्काऊटींग व मुलांसाठी स्काऊटिंग फॉर बॉईज हे पुस्तके लिहीले. सन 1909 साली गाईड चळवळीची सुरूवात झाली. 30 ऑक्टों 1992 रोजी कु.ओलेव्ह सोम्स यांनी बेडन पॉवेल यांच्याशी विवाह केला.यानंतर लेडी ओलेव्ह बेडन पॉवेल यांनी गाईड चळवळीचे सतत 61 वर्ष कार्य केले.त्या प्रमुख गाईड होत्या व जागतिक स्काऊट संस्थेच्या उपाध्यक्षा होत्या.

स्काऊट गाईड चळवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगातील सर्व लोकशाही देशातून चालणारी शैक्षणिक चळवळ आहे. या चळवळीमध्ये प्रामुख्याने शिल संवर्धन कौशल्य, आरोग्य व इतरांना सहाय्य करणे या चार तत्वाव्दारे लहान मुलांवर चांगले संस्कार करुन चारित्र्यवान नागरिक तयार करण्याचे अत्यंत उपयुक्त असे शिक्षण दिले जाते. समाजाला योग्य दिशा देणार्‍या स्काऊट गाईड ही जागतीक शैक्षणिक चळवळ आहे. बेडन पॉवेल यांनी 20 मुलांना घेऊन इंग्लडमध्ये 1907 मध्ये सुरु केलेली चळवळ आज जगातील 195 राष्ट्रातील 4 कोटीहून अधिक स्काऊट गाईड (विद्यार्थी) या खेळात अनुभवातून शिक्षण घेत आहेत. 3 ते 25 वयोगटातील मुलांमुलींसाठी संस्कारक्षम वयात त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन भावी नागरिक आदर्श चारित्र्य संपन्न घडविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक बांधिलकी, संस्कृतिक आदानप्रदान एैतिहासिक व मूल्याधिष्ठित प्रणालिसाठी सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासात वाढ करणारे शिक्षण देणारी स्काऊट गाइर्ड ही मुलभूत तत्वांवर अधारलेली एक वैशिष्टपूर्ण 109 वर्ष जुनी परंपरा लाभलेली चळवळ आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात केवळ ब्रिटिश मुलांसाठी हे शिक्षण मार्यादित होते. परंतु यांची आवश्यकता लक्षात घेऊन पंडीत मदन मोन मालवीय, पंडीत हृदयनाथ कुंझरु , डॉ. नी बेझंट, पंडीत श्रीराम वाजपेयी, डॉ.जी.एस. अरुंडेल यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान बॉय स्काऊट ऑफ इंडीया , हिंदुस्थान स्काऊट असोसिएशन, गर्ल गाईड असोसिएशन ऑफ इंडिया अशा वेगवेगळया संस्थांनी स्काऊट गाईडचे कार्य सुरु केले. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वरील सर्व संस्थांचे विलीनीकरण होऊन संपुर्ण भारत देशात 7 नोव्हेंबर 1950 रोजी भारत स्काऊटस्‌ आणि गाईडस्‌ राष्ट्रीय संस्था दिल्ली येथे अस्तित्वात आली. राज्य व जिल्हास्तरावर संस्था निर्माण करुन स्काऊट गाईड शालेय उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. संस्काराची चळवळ स्काऊट गाईडचे रोपटे लावणारे लॉर्ड बेडन पॉवेल यांनी मृत्युपूर्वी स्काऊट गाईड कार्यकर्ता करीता लिहीलेला शेवटचा संदेश 8 जानेवारी 1941 त्यांच्या निधनानंतर कागदपत्रात सापडला 109 जयंती निमित्त सर्वांनी त्याचे पालन करुन एक बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी सहकार्य करावे.

पीटर पॅन हे नाटक तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये चाचे लोकांच्या प्रमुख नेहमीच आपले मृत्युसमयीचे निरोपाचे भाषण करीत असे, ते तुम्हाला आठवत असेल. कदाचित खरोखरीच मरण आले तर ते बोलून टाकायला वेळ देखील मिळणार नाही, अशी भीती त्याला वाटत असावी. माझी देखील थोडी तशीच अवस्था झाली असावी . या क्षणी काही मी मरत नाही; तथापि आता केव्हातरी मरण येणारच आहे आणि मला तुम्हाला निरोपाचे चार शब्द सांगावयाचे आहेत. माझ्याकडून तुम्हाला ते ऐकावयाला मिळणारे असे हे शेवटचे शब्द आहेत, हे ध्यानात घ्या आणि त्यावर नीट विचार करा. माझे जीवन खूप सुखात गेले आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे जीवन तसेच सुखात जावे अशी माझी इच्छा आहे. या आनंदा मय जगात आनंदाने , सुखाने आणि समाधानाने आपण जगावे म्हणूनच देवाने आपल्याला जीवन दिले आहे अशी माझी श्रध्दा आहे. खूप श्रीमंत होऊन किंवा व्यवसायात यशस्वी होऊन अथवा अनेक प्रकारचे सुखोपभोग घेऊन खरे सुख व समाधान लाभत नाही. लहानपणी स्वत:ला आरोग्य संपन्न आणि शक्तिमान बनविणे ही सुखची पहिली पायरी आहे. त्यामुळे मोठे झाल्यावर तुम्ही इतरांच्या उपयोगी पडू शकता आणि त्यायोगे जीवनानंद प्राप्त करुन घेऊ शकता. निर्सगाचा अभ्यास करीत असतांना आनंदाकरिता या जगात परमेश्वराने किती सुंदर आणि अदभूत गोष्टी निर्माण केल्या आहेत हे कळून येईल. जे काही लाभले आहे त्यात समाधान माना आणि त्याचा अधिकात अधिक उपयोग करुन घ्या . कोणत्याही घटनेकडे उदासीन वृत्तीने व निराशेने पाहू नका ; उल्हासपूर्ण व आशादायक दृष्टीने पाहा.

इतरांना सुखी करणे हाच समाधान मिळवण्याचा खरा मार्ग आहे. या जगात तुम्ही पाऊल ठेवलेत, त्यापेक्षा जाताना हे जग थोडेतरी अधिक बरे करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा मरण समय येईल त्यावेळी आपण आपले आयुष्य व्यर्थ घालविले नाही, आपण आपल्याकडून शिकस्त केली आहे, असे समाधन तुम्हांला मिळेल. याप्रमाणे आनंदात जगण्याकरिता आणि आनंदाने मरण्याकरीता तयार रहा आपल्या स्काऊट वचनाची सदैव आठवण ठेवा. तुमचे बालपण संपल्यानंतरही स्काऊट वचनाचे पालन करा देव तुम्हाला या प्रयत्नात यश देवो. - बेडन पॉवेल ऑफ गिलवेल

चिंतन दिना निमित्ताने या चळवळीची सर्व मुला/मुलींना चांगली ओळख व्हावी प्रचार व प्रसार व्हावा या द्रष्टीकोणातून या चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जन्म दिवशी (जयंती) अर्थात 22.02.2016 रोजी जिल्हयातील सर्व शाळेत स्काऊट गाईड विभागातर्फे चिंतन दिनाचे महत्त्व सांगावे स्काऊट गाईड विषयावर भाषण, गितावलीतील गीते, गीतमंच, शेकोटी कार्यक्रम , स्वच्छता अभियान, सेवाकार्य इत्यादी अनेक व्यापक कार्यमाचे आयोजन करावे असे आव्हान करण्यात येते.
दिगंबर करंडे, जिल्हा संघटन आयुक्त

Related Photos