Breaking news

याची देही याची डोळा ’ अनुभवला पैठणचा नाथषष्ठी सोहळा…

भक्ताचा भर उन्हातील अमाप उत्साह दिंड्यांचे शिस्तबंध संचलन, टाळांचा खणखणाट आणि मृंदुगांचा नाद, हरिनामाचा जागर अशा भक्तीमय वातावरणात पैठण नगरी नाथमय झाली होती. निमित्त होते ते श्री क्षेत्र पैठणच्या संत श्री एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रेचे….

महाराष्ट्रात पैठणच्या नाथषष्ठी यात्रेस वारकरी संप्रादायात फार मोठे महत्व आहे. फाल्गुन वद्य बीज म्हणजे तुकाराम बीज या दिवसी पैठण गावातील नाथमंदीरातील पाण्याच्या रांजणाची पुजा करुन नाथषष्ठी सोहळ्यात सुरुवात होते. (दि. 29 ते 31 मार्च) या कालावधीत तीन दिवस हा यात्रा महोत्सव येथे सुरु होता. राज्यभरातून 550 वारकरी दिंड्या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. लाखो भक्तगण माऊलीचा यात्रेला आले होते. पैठण शहर नाथभक्तांच्या मांदीयाळीने अक्षरश: नाथमय झाले होते. ‘भानुदास एकनाथ’ अखंड नामाच्या गजराने अवघे शहर दूमदूमून गेले होते. गोदापात्रात पवित्र स्नान करुन भाविक नाथ समाधीच्या दर्शनासाठी रांगेत लागत होते. नाथमंदिरातील नाथ समाधीचे दर्शन घेऊन भाविक मार्गस्थ होत होते. यात्रा महोत्सव दरम्यान मंदिर परिसरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त्‍ होता. भाविकाच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले होते. तीनही दिवस लाखो भक्ताचा जनसागर पैठण यात्रेसाठी लोटला होता. पैठणमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांने संत महतांच्या दिंड्यांचे आगमन सुरुच होते.

यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी पहाटे गावातील नाथाच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाच्या महाअभिषेक सोहळ्याने यात्रेस प्रारंभ झाला पहाटेच्या आल्लाददायी वातावरणात साऱ्या गावात टाळ मृदूगांचा, नाथ नामाचा गजर सुरु होता. दुपारी गावातील नाथ मंदिरापासून नाथ समाधी मंदिरापर्यंत निर्वाण दिंडी काढण्यात आली. 417 वर्षापासून ही परंपरा सुरु असून दरवर्षी येथे लाखो वारकऱ्यांचा जनसमुदाय पैठण यात्रेस जमतो व नाथषष्टीच्या भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातो. या महोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी तीनही दिवस भजन कीर्तनाचे आयोजन केले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार रात्री 12 वाजेला छबिना मिरवणुक निघाली. या शेवटच्या दिवशी कालाष्टमी मुहुर्तानुसार दिंड्यांच्या फडावर फडकरी महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. काल्याची दहीहंडी फोडून काल्याचा महाप्रसाद घेऊन नाथषष्ठी सोहळ्याची सांगता झाली. आणि वारकरी व भक्तगणांनी पैठण नगरीचा निरोप घेतला.

नाथषष्ठी महोत्सवात भक्तगणांसाठी प्रशासनातर्फे सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सुसज्ज रस्ते, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, गाड्यासाठी पार्किंग व्यवस्था, एसटी महामंडळातर्फे विशेष जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी तीन दिवस चोवीस तास बससेवा सुरु होती. आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर व त्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. यात्रा काळात अन्न भेसळ व औषध प्रशासन विभागाचे पथक कार्यरत ठेवण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलातर्फे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर परिसरात व मंदिर परिसरात 40 ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिर प्रशासनाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने, पोलीस विभागाने नियोजनबध्द पध्दतीने सर्वांना दर्शन मिळावे याची व्यवस्था केली होती. शासकीय कामाचा भाग तसेच संत साहित्याची आवड असल्यामुळे मला नाथषष्ठी यात्रेत जाण्याची संधी मिळाली. म्हणूनच याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवता आला पैठणचा नाथषष्ठी सोहळा !
डॉ. रवींद्र ठाकूर, औरंगाबाद

Related Photos