Breaking news

भारतीय संस्कृतीचे रक्षणकर्ता श्री गुरु गोबिंदसिंघजी

श्री गुरु गोबिंदसिंघ जी शीख धर्माचे दहावे गुरु म्हणून श्री गुरु गोबिंदसिंघ जी यांची ओळख होय. नऊ वर्षाच्या कोवळ्या वयात शीख पंथाची सुत्रं सांभळून गुरु गोबिंदसिंघ जी यांनी पुढे चालून अन्याय-अत्याचारा विरुध्द लढा देण्यासाठी, शुध्द जीवन आचरणासाठी खालसा पंथाची स्थापना केली. गुरुजींचे संपूर्ण आयुष्य संघर्षाची एक गाथा असून एक सच्चा संत आणि एक सच्चा शिपाई अशी त्यांची एक आगळी-वेगळी ओळख भारतीय समाजात व्याप्त आहे. गुरुजींचा जीवन संघर्ष आणि त्यांनी दिलेले बलिदान आजच्या पिढीला अवगत होणे फार गरजेचे आहे. भारताच्या भूमिवर सर्वात प्रथमअध्यात्मिक क्रांति करुन त्याच्या माध्यमेतून गोर, गरीब, दलित आणि वंचितांचे रक्षण करण्यासोबतच भारत भूमींच्या संस्कृतीचे रक्षण करण्या सारखा अद्वितीय असा कार्य त्यांनी पार पाडला. गुरु गोबिंद सिंघ जी शीख धर्माचे दहावे गुरु होण्यापूर्वीचे जवळपास 206 वर्षांचे विस्तृत असे शीख पंथाचे इतिहास आहे. परमेश्वराची भक्ति करणार्‍या एक संत परंपरेतील पंथाला वारंवार तत्कालीन सत्ताधीशांच्या मोठ्या सैन्य शक्तींशी झुंज द्यावी लागते, प्रतिकार करावे लागते, स्वतःचे आणि इतरांचे धर्म परिवर्तन रोखण्यासाठी बलिदान करावे लागते ही त्याकाळची परिस्थिती होती. आणि त्या विकट परिस्थितीतून उद्भवला गुरु गोबिंदसिंघ नावाचा एक तारणहार ज्याने उपेक्षितासोबत राहून त्यांच्यात स्वरक्षण करण्याची आत्मशक्ति जागृत केली. गुरु गोबिंदसिंघ जी यांच्या विषयीं, दशमपिता, बादशाह दरवेश, दुष्टदमन, कलगीधर, बाजांवाले, अमृत के दाते, पंथ देवाली सारखे संबोधन ही वापरण्यात येतात. अशा महान गुरुंचा अवतार बिहार येथील पटना शहरात अवतरला. ज्यादिवशी गुुरुजीनी जन्मघेतला त्या दिवशी पोह सुदी संवत 1723 (22 डिसेंबर, 1666) अशी तिथि होती. काही लेखकांनी जन्मतिथित 26 डिसेंबर या तारखेचा वर्णन केलेला आहे पण मोठ्या संख्येत लेखकांनी 22 डिसेंबरच्याच तिथीची निवड केलेली आहे. तिथीनुसार गुरुजींचा 350 वां जन्मोत्सव हा 5 जानेवारी,2017 रोजी साजरा करण्यात येत आहे. गुरुजींच्या आईचे नाव गुजरी जी (माता गुजरी जी) होते तर वडिलांचे नाव तेगबहादर (गुरु तेगबहादर) असे होते. गुरु तेगबहादर जी हे धर्माने क्षत्रिय असून सोढी वंशांतील होते. प्रभु रामचंद्र यांचे पुत्र कुश यांच्या कुलात त्यांचे जन्मझाले होते हे स्वतः गुरु जी नीं उल्लेख केलाला आढळतो. गुरु गोबिंदसिंघ जी यांनी आपल्या जन्मा विषयीची माहिती आणि कारण बचित्र नाटक या रचनेत काव्यशैलीत स्पष्ट केलेले आहे. आपले जन्मसोढी वंशात झाल्याचे ते सांगतात. गुरुजींच्या शबदात, अब मै कहो सु अपनी कथा।। सोढी बंस उपजिया जथा।। वरील दोह्यात सोढी वंशांचे उल्लेख आढळून येते. गुरुजीनी स्वतःस परमेश्वराचा दास असे संबोधन दिलेले आहे. त्यांनी कधी ही स्वतःला परमेश्वर किंवा देव म्हणून घेतलेले नाही. तर आपल्या जन्मघेण्याविषयी त्यांनी आपल्या आत्मकथेत स्पष्ट केले आहे की त्यांचा या भूमींवर झालेला जन्मप्रसंग हा देवाच्या इच्छेनुसार होता. गुरजींनी बचित्र नाटक या रचनेत खालील प्रमाणे आशय व्यक्त केलेला आहे,
हमयह काज जगत मो आए। धर्म हेत गुरुदेव पठाए।।
जहां तहां तुमधरमबिथारों। दुष्ट दोखियन पकर पछारो।।
याही काज धरा हमजनमं। समझि लेहु साधु सब मनमं।।
धरमचलावन, संत उबारन। दुसट सभन को मूल उपारन।।43।।

वरील ओळीत गुरुजी म्हणातात, परमपित्याने, मला या भूमीवर एका विशिष्ट उद्देशासाठी पाठविलेले आहे. परमपिता परमेश्वरांनी साधूसंतांच्या रक्षार्थ आणि धर्म आणि संस्कृतिच्या रक्षणासाठी मला मुद्दामहुन पाठविलेले आहे. दुष्टांना धडा शिकवण्यासाठीच माझा जन्मझालेला आहे. गुरुजींनी स्वतःला परमपुरख को दासां असे ही संबोधन दिलेले आहे. आणि त्यांनी ते संबोधन सार्थक ही केलेले आहे. गुरुजीनी गोर-गरीब आणि वंचितांच्या जीवांच्या रक्षणाचा वीडा उचलला आणि धर्मरक्षणासाठी आपले चार पुत्रं, आई आणि वडील यांचे बलिदान करुन टाकले. पण आजच्या समाजाला शीख गुरुंनी केलेल्या बलिदानाचे आणि शीख पंथांच्या कार्याचे महत्व योग्यरित्या समजलेलेच नाही. गुरुजींच्या जीवनकार्यांची नोंद ठेवण्यात भारतीय समाजाने नेहमीच उदासिनता दाखवलेली आहे. दुसरीकडे मोगल इतिहासकारांनी गुरुंजींना नेहमीच शत्रुं म्हणून त्यांच्या कडे पाहिलेले आहे. त्यामुळेच भारतात एक धर्म आणि संस्कृतीरक्षकाच्या जन्मदिवसा विषयी स्मरण करुन द्यावे लागते की गुरु गोबिंदसिंघ जी हे मुळात कोण होते. सुमारे 350 वर्षापुर्वी भारताच्या पटना शहरात जन्मघेऊन गुरुजींनी आनंदपुर साहिब (पंजाब) येथे वर्ष 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथांची स्थापना करता वेळी गुरुजींनी जाती-पातीचा विचार केला नाही तर दलित, शुद्र यांना ही अमृताची दीक्षा देऊन खालसा पंथात त्यांना सन्मानाने वागणूक दिली. गुरुजीनी अन्याय, अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी वेगवेगळे असे सोळा युध्द केले. त्यात नौदान, भंगाणी, चमकौर, आनंदपुर, बंसाली सारख्या मोठ्या युध्दांचे वर्णन होऊ शकते. लाखोंच्या सेने विरुध्द अल्पसंख्या असणार्‍या शीख सेनेला सोबत घेऊन गुरुजींनी त्या युध्दात विजय मिळवला होता. सव्वा लाख से एक लड़ाऊ. तबै गोबिंदसिंघ नामकहाऊं हे जयघोष वाक्य फक्त गुरु गोबिंदसिंघजी यांनाच शोभून दिसणारे आणि त्यांचे व्यक्तीमत्व स्पष्ट करणारे असे आहे.

तर दुसरीकडे गुरुजींनी, मानवांना परमेश्वराच्या भक्तीकडे वळवण्यासाठी अभ्यासपूर्ण अशा सोळा वाण्या (गुरुबाणी) लिहून त्यातून श्री दशमग्रंथ साहब सारखा प्रबोधनयुक्त असा महान ग्रंथ देखील या जगाला दिला. दशमग्रंथसाहेब मध्ये श्री जाप साहिब, अकाल उसतित, शबद हजारें पातशाही दसवीं, चण्डी चरित्र एक, चण्डी चरित्र दोन, वार स्त्री भगोउती जी, गिआन प्रबोध, चरित्रोपख्यान, बचित्र नाटक, महदी मीर, जफरनामा, रामावतार, ब्रहमावतार, रुद्रावतार, शस्त्रनाममाला, स्फुट सवैय्ये, हिकायतें अशा सोळाप्रकारच्या वाण्यांचा समावेश आहे. गुरु गोबिंदसिंघ जी यांनी आपल्या शेवटच्या क्षणी श्री आदि गुरु ग्रंथसाहिबांना नांदेड मध्ये गुरुगादी प्रदान केली. गुरु ग्रंथसाहेबांना गुरुगादी प्रदान करुन त्यांनी देहधारी गुरुंची परंपरा संपवली. तीन शतकाहुन अधिक काळ शीख पंथांला श्री गुरु ग्रंथसाहेबाकडून दिशानिर्देश मिळत आहे. श्री गुरु गोबिंदसिंघ जी अशा दूरदृष्टीचे ही मालक होते. त्यांनी निर्माण केलला संकल्प आज ही पंथासमोर आहे. गुरुजींनी नांदेड मध्ये शीख समुदायाला अनुसरुन केलेले 52 वचन (उपदेश) आज ही रोज उचारले जातात. पण आता गुरुजींच्या 350 व्या जन्मोत्सवावेळी त्या उपदेशांची अनुपालना करण्याचा शुभप्रसंग समोर चालून आलेला आहे. गुरुजींचे कार्य आणि उपदेश एका शुध्द जीवनशैली कडे ओळवतात. सोबत परमेश्वराच्या भक्तीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचे उपदेश नेहमीच प्रोत्साहित करतात. अशा महान गुरुंना शुध्द अंतकरनाने नमनः रविंदरसिंघ मोदी, नांदेड

Related Photos