logo

BREAKING NEWS

जातीय व्यवस्था नष्ट होण्यासाठी म. बसवेश्वरांचे विचार समाजात रूजले पाहिजे - डॉ. सोलापूरे

कंधार, आज समाजात मोठ्या प्रमाणात जातीय व्यवस्था निर्माण झाली आहे. 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जातीय व्यवस्था नष्ट करण्याचे काम त्यांनी केले. केवळ एवढेच नसून आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे कामही त्यांच्या हातून झाले आहे. यामुळे समाजातील जातीय व्यवस्था नष्ट होण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची गरज आज समाजात रूजणे महत्वाचे आहे. जोपर्यंत समाजात विचार रूजणार नाहीत तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही असे मत प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. राजशेखर सोलापूरे यांनी व्यक्त केले.

कंधार तालुक्यातील शिराढोण येथे महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोलापूरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माधवराव पांडागळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नागेश कऱ्हाळे, सुभाशिष कामेवार, भगवानराव चिवडे, सरपंच प्रतिनिधी सुर्यकांत आळणे, माधवराव पा. कपाळे, बालाजी पांडागळे, गणपतराव दवणे, शिवा सोनटक्के, बी.टी. पांडागळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. सोलापूरे बोलत असताना म्हणाले, सर्वप्रथम कल्याणकारी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते महात्मा बसवेश्वरांनी केले आहे. याचा आदर्श सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व घोटाळे होत आहेत. विज्ञानाचा दृष्टीकोन मांडून बसवेश्वरांनी अनेक संकल्पना 12 व्या शतकात समोर आणल्या. आज महामानवाचे चरित्र किंवा महामानवांच्या फोटो लावण्याची गरज नसून त्यांची विचारांची गरज आहे. पण सध्याच्या काळात त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या फोटो लावण्याचा प्रकार अधिकच वाढत चालला आहे. इ.सन.पूर्व गौतम बुद्धांनी कामभक्ती, तृष्णा, क्रोध या गोष्टीला त्यांनी दूर ठेवले होते. पण याच गोष्टी समाजात वाढत चालल्या आहेत, गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आज समाजाला निर्माण झाली असून समाजात मात्र त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या फोटोला अधिक महत्व दिले जात आहे. 

यामुळे महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचले पाहिजे. आज मंदिर आणि देवालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, यापेक्षा समाजातील गरजूवंत नागरिकांना मदत करून त्यांची घरे बांधणीसाठी किंवा गरीब कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी मदत करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ना. नागेश कऱ्हाळे, माधवराव पांडागळे, सुभाशिष कामेवार यांनीही मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मन्मथ पांडागळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौडम, जयंती मंडळाचे अध्यक्ष साईनाथ केते, उपाध्यक्ष माधव नागठाणे, सचिव अभिषेक पांडागळे, योगेश खुर्दामळे, सुनील भुरे, आकाश कनशेट्टे, नरहरी देवणे, शुभम भुरे, नरेंद्र वारकड आदीजणांनी परिश्रम घेतले आहे.

    Tags