Breaking news

..म्हणे आ.चिखलीकरांच्या सतर्कतेने जिल्हा बँक आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून वाचली

नांदेड(खास प्रतिनिधी)नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या भंगारखान्याच्या खोलीला आज दुपारी दोन वाजता आग लागली. बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सतर्कतेमुळे सदरची आग अर्ध्या तासात आटोक्यात आली.

आज दुपारी दोन वाजता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य शाखेतील पाठीमागेच्या भागात असलेल्या भंगार खोलीला अचानकपणे आग लागली. जिल्ह्यातील बंद असलेल्या अनेक शाखांमधील फर्निचर व अन्य अनावश्यक वस्तू याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. अडगळीच्या भागात असलेल्या या खोलीकडे फारसे कुणाचे लक्ष नसायचे. मात्र आज दुपारी या भागात अचानक आग लागली. हाहा म्हणता या आगीने चांगलाच पेट घेतला. घटनेचे वृत्त समजताच सर्व कार्यक्रम बाजूला सारुन बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आपल्या सर्व समर्थकांसह घटनास्थळी पोहंचले. वाटेतच असताना त्यांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांना तातडीने पाचारण केले आणि अर्ध्यातासाच्या आत सदरची आग आटोक्यात आणली. या बाबत बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, बॅंकेच्या मागच्या बाजूस अनावश्यक असलेले फर्निचर तसेच वेगवेगळ्य शाखांमध्ये असलेले व कालबाह्य झालेले लोखंडी व लाकडी सामान त्याठिकाणी ठेवण्यात आले आहे. अडगळीचा भाग असल्याने तिकडे कुणी जात नाही, मात्र आज अचानक या भागाला आग लागली. ही वृत्त समजताच आपण तातडीने घटनास्थळी धावलो आणि योग्य ती मदत उपलब्ध करुनं दिली. बॅंकेच्या संदर्भात शहरात आज वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असताना अध्यक्षांनीच आक्रमकपणे या आगीसंदर्भात तातडीने पावले उचलून ही आग आटोक्यात आणली. या आगीत बॅंकेची कुठलीही कागदपत्रे किंवा जुने रेकॉर्ड जळाले नसल्याचे स्पष्ट करुन बॅंकेचे सर्व दस्तावेज सुरक्षित असल्याचा निर्वाळा आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिला.

Related Photos