Breaking news

विष्णूपुरीत खून करणाऱ्या मुख्य मारेकऱ्यास 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(खास प्रतिनिधी)होळीच्या दिवशी विष्णूपुरी भागात एका 30 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला आज सहाव्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. यापूर्वी काल 13 मार्चपासून दोन जण अगोदरच 16 मार्चपर्यंतच्या पोलीस कोठडीत आहेत.

12 मार्चच्या सायंकाळी सर्वत्र होळीचे दहन सुरु असताना शासकीय रुग्णालयातील चहाचे दुकानदार ज्ञानेश्र्वर बालाजी हंबर्डे (30) हे आपल्या घराकडे जात असताना विष्णूपुरी, काळेश्र्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन जणांनी त्याच्या छातीत खंजीर भोकून जीव घेतल्याची तक्रार मयत ज्ञानेश्र्वर हंबर्डे यांच्या भावाने दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकाश बालाजी बारसे (20), सुनिल शाम भारती (21) आणि रामा बळी गायकवाड (29) अशा तीन जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक परशुराम मराडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात 12 मार्चच्या रात्री आकाश बारसे आणि सुनिल भारती यांना अटक केली. त्यांना धुलवडीच्या दिवशी, 13 मार्चला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्या दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यानंतर फरार असलेला रामा बळी गायकवाड यास पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, पोलीस कर्मचारी मुस्तापुरे आणि बालाजी सातपुते यांनी पेठवडज येथून पकडून आणले. त्यास आज पोलीस उपनिरीक्षक मराडे यांनी न्यायालयात हजर केले त्यास सहाव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Related Photos