आर्य वैश्य समाज परिचय मेळाव्यातून सामाजिक व राष्ट्रीयत्वाची प्रचिती - कंदकुर्ते

नांदेड(प्रतिनिधी)आर्य वैश्य समाज उपवधू-उपवर परिचय मेळावे आदर्शवत ठरले असून यातूनच सामाजिक आणि राष्ट्रीयत्वाची प्रचिती सर्वांना झाल्यामुळे समाजोन्नतीतून राष्ट्रोन्नतीचे उद्दीष्ट साध्य होत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी केले.

दि.18 आणि 19 मार्च दरम्यान चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित आंतरराज्यस्तरावरील मेळाव्याचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगरेश्र्वर वैश्य मंदिराचे अध्यक्ष दिलीप बंडेवार तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती रमेशसेठ पारसेवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, पुणे येथील उद्योगपती शेखर झिलपिलवार, बैंगलोर येथील के.विश्र्वनाथ, रामचंद्र मुर्ती, मेळावा प्रमुख गणेश दि.महाजन, उपाध्यक्ष बिपीन गादेवार, सचिव भागवत गंगमवार, सहसचिव आनंद जबादवार, सहसचिव रितेश व्यवहारे आणि कोषाध्यक्ष पांडुरंग येरावार आदी मान्यवर उपस्थित होते.

समाज बांधवांना सर्वार्थाने लाभान्वित करण्याचा संकल्प दानशूर समाज बांधव आणि मेळाव्याच्या सर्व समितींचे सदस्यांमुळे पूर्णत्वास जात असल्याचे यावेळी प्रास्ताविकात मेळावा प्रमुख गणेश महाजन यांनी सांगितले. विवाहप्रक्रीया सुलभ व सुकर करण्यासाठी उपवर-उपवधू यांनी अधिकाधिक प्रमाणात परिचय करुन द्यावेत व समाज बांधवांनी जास्तीत जास्त विवाह जुळवून यावेत ह्याकरीता प्रयत्नशील रहावे असे आवाहन यावेळी श्री नगरेश्र्वर वैश्य मंदिराचे अध्यक्ष दिलीप गादेवार यांनी अध्यक्षीय समारोपात केले. महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यावेळी बोलतांना म्हणाले की, प्रतिवर्षी केवळ विभागावार मेळावे घेऊन सहकार्य करावे तसेच व्यावसायिक मेळावे घेऊ नयेत. आर्य वैश्य कोमटी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमांतर्गत ओढीचे क्षण जोडीचे ह्या स्मरणिकेचे प्रकाशन उद्योगपती शेखर झिळपिलवार पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले. नांदेडचा मेळावा हा समाज बांधवांसाठी पर्वणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय बंडेवारयांनी केले तर सचिव भागवत गंगमवार यांनी आभार मानले.

Related Photos