Breaking news

भाषांतरामुळे ज्ञाननिर्मितीमध्ये भर पडते - डॉ. माया पंडित यांचे प्रतिपादन

नांदेड(प्रतिनिधी)"साहित्य आणि समाज समृध्द करण्यासाठी अनुवाद महत्त्वाचे असतात. भाषांतरामुळे ज्ञाननिर्मिती आणि ज्ञान विस्तारास मदत होते. भाषेच्या संगोपनासाठी भाषांतर आवश्यक आहे", असे प्रतिपादन हैद्राबाद येथील इंग्लीश आणि फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटीच्या माजी प्र-कुलगुरू व सुप्रसिध्द अनुवादक डॉ. माया पंडित यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. माया पंडित बोलत होत्या. 'भाषांतर: सिध्दांत आणि व्यवहार' या विषयावर विद्यापीठात दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे होते. संकुलाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. नीना गोगटे, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. योगिनी सातारकर यांची विचारमंचावर यावेळी उपस्थिती होती. 'भारतातील बहुभाषिकतेमध्ये अनुवादाचे विशेष महत्त्व आहे. सांस्कृतिक सामाजिक भाषीक विभीन्नता देशाचे वैभव आहे. या ठिकाणी भाषांतरास भविष्य आहे' असे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले.

चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी देशभरातील अभ्यासक आले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भाषांतरकार डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्यासह डॉ. छाया यार्दी (पुणे), डॉ. अवंतिका शुक्ला (वर्धा), डॉ- निर्मला जाधव (औरंगाबाद), डॉ. दीपक बोरगावे (पुणे), डॉ. महेश लीला पंडित (मुंबई), डॉ. गणेश मोहिते (बीड), डॉ. शिवदत्त वाव्हळकर (पुणे), डॉ. लोकेश मालती प्रकाश (भोपाळ), डॉ. सोनाली कुलकर्णी (औरंगाबाद) आदी अनुवादकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Related Photos